
देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. हिंदुस्थानात लवकरच सहावी कोरोनावरील लस उपल्बध होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, झायडस कॅडिला कंपनीची Zycov-d लसीला लवकरच केंद्र सरकार मंजूर देऊ शकते.
डीएनए-प्लास्मिडवर आधारित ‘Zycov-d’ लसीचे तीन डोस असतील. ही लस दोन ते चार अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येऊ शकते. यासाठी कोल्ड चेनची आवश्यकता नसणार आहे. देशाच्या कोणत्याही भागात ही लस सहज पोहोचवली जाऊ शकते. बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स काऊन्सिल (बीआयआरएसी) अंतर्गत नॅशनल बायोफार्मा मिशन (एनबीएम) ने या लसीला मान्यता दिली आहे. प्रौढांसह 12 ते 18 वयोगटातील मुलांवरही या लसीची चाचणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शनिवारी जॉन्सन अँड जॉन्सनच्या अँटी-कोविड -19 लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजूर देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शनिवारी म्हटले की, या लसीमुळे कोरोना संसर्ग रोखण्यात देशाच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळेल.
मंडाविया यांनी ट्विट करत लिहिले की, ‘हिंदुस्थानने लसींची आपली टोपली आणखीन मोठी केली आहे. हिंदुस्थानात जॉन्सन अँड जॉन्सनची एक डोस अँटी-कोविड -19 लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजूर देण्यात आली आहे. आता हिंदुस्थानकडे आपत्कालीन वापरासाठी पाच लसी आहेत. यामुळे कोरोना संसर्गाविरूद्धच्या लढाईत देशाच्या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळेल.





























































