प्रशासकीय अधिकारी बढतीच्या प्रतीक्षेत, सनदी अधिकाऱ्यांची 110पदे रिक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी 415 पदे आहेत. यातील 305 पदांवर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उर्वरित 110 रिक्त पदे वर्षानुवर्षे रिक्तच असून या पदांवर पदोन्नतीने नियुक्तीसाठी 25 मराठी अधिकारी प्रतीक्षेत असूनही त्यांना पदोन्नती दिली जात नसल्याची बाब समोर आली आहे.

महाराष्ट्रात राज्य नागरी सेवेतील अधिकाऱयांना 25 वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेत बढती दिली जाते. केरळमध्ये 8 वर्षे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामीळनाडू या राज्यांमध्ये 10 ते 15 वर्षांत राज्य नागरी सेवेतील अधिकाऱयांना सनदी अधिकारी म्हणून पदोन्नती दिली जाते. अन्य राज्यांत हा कालावधी कमी असूनही महाराष्ट्रात मात्र अशा पदोन्नतीचा कालावधी 25 वर्षे आहे. सध्या अशी 25 वर्षे सेवा पूर्ण केलेले राज्य नागरी सेवेत 25हून अधिक मराठी अधिकारी आहेत. मात्र मागील सरकारच्या काळापासून या अधिकाऱयांच्या पदोन्नतीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नियुक्तीसाठी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी यांनी ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पत्र दिले असून मराठी अधिकाऱयांवर होणारा हा अन्याय थांबवावा अशी मागणी केली आहे. या पदोन्नतीबाबत यूपीएससी आणि राज्य सरकार यामध्ये बैठक व्हावी लागते. मात्र 2018 पासून यासंदर्भात कोणतीच बैठक झालेली नाही. ही बैठक बोलावून संबंधित अधिकाऱयांना न्याय द्यावा आणि त्यांना सनदी अधिकारी म्हणून पदोन्नती देऊन नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी विष्णू गवळी यांनी केली आहे.