
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती सरकार पडल्यानंतर राज्यपाल शासन लागू करण्यात आले आहे. राज्यपाल एन एन वोहरा यांनी राज्याचा कारभार हाती घेतला असून बैठकाही सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन ऑलआऊट अधिक कठोर करण्याच्या सूचनाही लष्कराला देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत जम्मू-कश्मीरमध्ये २०० दहशतवादी व त्यांच्या ३००० खबऱ्यांवर लष्कराचा वॉच असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार कश्मीर खोऱ्यात दोन प्रकारे ऑपरेशन ऑलआऊट ही मोहीम राबवणार आहे. यात एकीकडे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या Over Ground Workers (OWG) खबऱ्यांवरही निशाणा साधला जाणार आहे.
लष्कराला मिळालेल्या माहितीनुसार सध्या जम्मू-कश्मीरमध्ये २०० दहशतवादी आणि त्यांना लष्कराच्या हालचालींची माहिती पुरवणारे ३००० खबरी सक्रीय आहेत. त्यांना शोधण्यासाठी लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे. यासाठी सायबर टीमही तयार करण्यात आली आहे. हे खबरी सांकेतिक भाषेत सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवाद्यांना माहिती पुरवत आहेत. यामुळे या खबऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सायबर टीम तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे जवानांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.
जम्मू -कश्मीरमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात केंद्र सरकारने एकतर्फी शस्त्रसंधी लागू केली होती. पण तरीही दहशतवादी हल्ले झाल्याने ही शस्त्रसंधी मागे घेण्यात आली आहे. त्यानंतर गेल्या ४८ तासात सातहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांना मदत करणारे खबरे हे दहशतवादी नाहीत. पण ते दहशतवाद्यांना लष्कराच्या प्रत्येक हालचालींची माहिती देत असतात. ज्यामुळे दहशतवादी सावध होतात व पुढच्या हल्ल्याची तयारी करतात.
काहीदिवसांपूर्वी जम्मू-कश्मीरमध्ये पत्रकार शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. मोटारबाईकवर आलेल्या तीन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पण हत्येनंतर चौथ्या एका व्यक्तीने घटनास्थळावर पडलेली पिस्तुल उचलून पळ काढल्याची माहिती एका नागरिकाने पोलिसांना दिली होती. विशेष म्हणजे ही चौथी व्यक्ती नागरिकांच्या गर्दीतीलच होती व पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने पिस्तुल पळवल्याचे समोर आले आहे.






























































