एलओसीवर 42 बॉम्ब केले निकामी

सुरक्षा दलांनी आज जम्मू आणि कश्मीरच्या पुंछ जिह्यातील नियंत्रण रेषेजवळच्या विविध गावांमध्ये सापडलेले तब्बल 42 जिवंत बॉम्ब निकामी केले. युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवर सातत्याने गोळीबार आणि तोफगोळय़ांचा मारा करण्यात आला. यावेळी अनेक तोफगोळे विविध ठिकाणी पडले होते, मात्र ते फुटले नव्हते.

हिंदुस्थानी लष्कराने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने आणि बॉम्बनाशक पथकाच्या मदतीने नियंत्रण रेषेवरील झुल्लास, सलोत्री, धरती आणि सलानी अशा विविध ठिकाणी सापडलेले बॉम्ब यशस्वीरीत्या निकामी केल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी दिली. हे बॉम्ब वेळीच निष्क्रिय केले नसते तर मोठी जीवित हानी झाली असती.