
एलएसीवर चीनशी तणावाचे वातावरण असतानाही हिंदुस्थानी लष्कराने आपली मानवतावादी प्रतिमा कायम ठेवली आहे. रक्त गोठवणाऱ्या थंडीत वाट चुकलेल्या चिनी प्रवाशांचे जीव वाचवत हिंदुस्थानच्या जवानांनी त्यांना खाणे, गरम कपडे आणि अन्य मदत पुरवली. 3 सप्टेंबरला आपल्या कारमधून फिरायला निघालेले 3 चिनी प्रवासी रस्ता चुकून सिक्कीमच्या पठारावर भरकटले होते. त्यातील काही जणांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. सीमेवर खडा पहारा देणाऱ्या जवानाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी या प्रवाशांच्या मदतीसाठी धाव घेतली.
आपल्या कारने बर्फाळ पहाडी प्रदेशात भटकंती करताना चिनी प्रवासी 17 हजार फूट उंचीवर रस्ता चुकून हिंदुस्थानी हद्दीत आले. सभोवताली बर्फ आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे या प्रवाशांचा श्वास कोंडू लागला होता. हिंदुस्थानी जवानांना ही गोष्ट कळताच त्यांनी ऑक्सिजन सिलिंडरसह घटनास्थळी धाव घेतली. चिनी नागरिकांना ऑक्सिजनचा पुरवठा करीत ठीक केल्यावर जवानांनी आपल्याकडचे खाणे आणि गरम कपडेही संकटग्रस्त प्रवाशांना दिले आणि त्यांना सुखरूप योग्य रस्त्यावर नेऊन सोडले.
कारमधील बिघाडही जवानांनी दूर केला
सिक्कीमच्या पठारावर भरकटलेल्या तीन चिनी प्रवाशांची कारही प्रचंड गारठ्यात नादुरुस्त झाली होती. हिंदुस्थानी जवानांनी त्यांच्या कारमधील बिघाडही दूर केला आणि या प्रवाशांना त्यांच्या देशात मार्गस्थ केले. हिंदुस्थानी लष्कराच्या या मदतीने संकटातून वाचलेले चिनी नागरिक अतिशय भारावून गेले होते. त्यांनी हिंदुस्थानी जवानांचा जयजयकार करीत त्यांचे आभार मानले.
























































