लॉकडाऊनमध्ये श्रीमंत तुपाशी, गरीब उपाशी, 100 धनाढय़ांच्या संपत्तीत 13 लाख कोटींची वाढ!

कोरोना लॉकडाऊनमध्ये श्रीमंत व गरीब यांच्यातील विषमतेची दरी आणखीन वाढली. देशातील आघाडीच्या 100 धनाढय़ांची संपत्ती तब्बल 13 लाख कोटींनी वाढली. याचवेळी 84 टक्के घरांना मात्र पैशांच्या चणचणीचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी एकटय़ा एप्रिल महिन्यात प्रत्येक तासाला 1 लाख 70 हजार लोकांना नोकरी गमवावी लागली. ‘ऑक्सफॅम’ संस्थेच्या अहवालातून हे भीषण वास्तव समोर आले आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत बनले, तर सर्वसामान्य, गोरगरीबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आणखीन गंभीर बनला. महामारीमुळे दारिद्रय़ात फसलेल्या अब्जावधी गरीब लोकांना सावरण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असे ऑक्सफॅम संस्थेने ‘द इनइक्वलिटी व्हायरस’ नावाच्या अहवालात म्हटले आहे. जगभरातील 1000 सर्वाधिक श्रीमंत लोकांनी आपले नुकसान 9 महिन्यांतच भरून काढले. मार्च 2020 नंतर ंहदुस्थानातील 100 अब्जाधिशांनी जेवढी संपत्ती कमावली आहे, त्या संपत्तीतून देशाच्या 13 कोटी 8 लाख जनतेला प्रत्येकी 94,045 रुपयांची मदत केली जाऊ शकते, असेही मत ऑक्सफॅमच्या अहवालात नोंदवले आहे.

‘ऑक्सफॅम’च्या अहवालातील निष्कर्ष

– हिंदुस्थानी अब्जाधीशांच्या संपत्तीत लॉकडाऊन काळात 35 टक्क्यांची वाढ झाली. तसेच 2009 पासून आतापर्यंत तब्बल 90 टक्क्यांनी संपत्ती वाढली आहे.

– लॉकडाऊनमध्ये देशातील आघाडीच्या धनाढय़ांच्या संपत्तीत जेवढी वाढ झाली आहे, त्या संपत्तीतून 10 वर्षे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार निर्मिती योजना किंवा आरोग्य मंत्रालयाचे कामकाज चालवले जाऊ शकते.

– लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबातील मुलांनी शिक्षणाच्या बाबतीत आव्हानांचा सामना केला. ग्रामीण भागातील केवळ 4 टक्के कुटुंबांकडे संगणक होता, तर 15 टक्क्यांहून कमी पुटुंबांकडे इंटरनेट कनेक्शन होते.

– बहुतांश सरकारी रुग्णालये कोरोनाची चाचणी केंद्रे किंवा कोरोना रुग्णालये बनली होती. त्यामुळे गर्भवती महिलांचे प्रचंड हाल झाले

आपली प्रतिक्रिया द्या