
तब्बल सहा कोटी रुपये किमतीची असलेली बेंटले ही आलिशान कार आणण्यासाठी केरळमधील एका उद्योजकाने चक्क हेलिकॉप्टरमधून एंट्री घेतली आहे. पोलंड मुसा ऊर्फ मुसा हाजी असे या उद्योजकाचे नाव असून ते केरळमधील फ्रॅगरन्स वर्ल्ड या पंपनीचे मालक आहेत. या वेळी त्यांच्यासोबत महागडय़ा कारचा ताफासुद्धा दिसत होता. पोलंड मुसा यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बेंटले पंपनीची कार घ्यायला पोहोचतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पोलंड मुसा यांचे हेलिकॉप्टर मलप्पुरममधील एका महालावरून जात असल्याचे पाहायला मिळतेय. पोलंड मुसा जेव्हा हेलिकॉप्टरमधून उतरतात, त्या वेळी रेंज रोव्हर, लँड रोव्हर डिफेंडर 110 आणि टोयोटा लँड क्रूझर या तीन अलिशान गाडय़ांचा ताफा व्हिडीओत दिसतात.

























































