हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला करणारे यूएसमध्ये पळाल्याची सूत्रांची माहिती

Indian consulate attackers

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) च्या सूत्रांच्या माध्यमातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. NIA च्या सूत्रांनी सांगितलं की, पंजाब आणि हरियाणातील अनेक लोकांना ऑनलाइन कट्टरपंथी बनवण्यात आले आणि त्यानंतर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासावर हल्ले करण्यासाठी त्यांना परदेशात पाठवण्यात आलं.

या वर्षी 19 मार्च आणि 2 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्यांच्या संदर्भात NIA ने गेल्या आठवड्यात पंजाब आणि हरियाणामधील 14 ठिकाणी छापे टाकल्यानंतर हा खुलासा झाला आहे. या हल्ल्यांमागील कट उलगडणे, कट्टरतावादाच्या गुंतागुंतीच्या जाळ्यावर आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कारवायांवर प्रकाश टाकणे असे या छाप्यांमागील उद्दिष्ट होते असे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माहितीनुसार पंजाब आणि हरियाणामधील लोकांविरुद्ध तपास सुरू करण्यात आला होता आणि वाणिज्य दूतावास हल्ल्याप्रकरणी ओळख पटलेल्या लोकांशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे संपर्क करण्यात आला होता.

एनआयएच्या सूत्रांनी सांगितलं की, ऑनलाइन संपर्काद्वारे कट्टरपंथीय विचारधारेचा प्रभाव असलेल्यांना मोठ्या संख्येनं अलीकडेच खलिस्तानी कारवायांमध्ये भाग घेतल्याबद्दल अमेरिकेत पाठवण्यात आलं आहे. त्यांचं प्राथमिक लक्ष्य हिंदुस्थानचं राजकीय मिशन असल्याचं दिसतं, असं सूत्रांनी सांगितलं.

तस्करी आणि कट्टरतावादाच्या पुढील घटनांशी संभाव्य दुवे शोधण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवत आहे. NIAच्या सूत्रांनी सांगितलं की एजन्सी सॅन फ्रान्सिस्कोमधील हिंदुस्थान वाणिज्य दूतावास आणि लंडनमधील हिंदुस्थानच्या उच्चायुक्तालयाची तोडफोड करण्यात सहभागी असलेल्या किमान 30 खलिस्तानी समर्थकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

क्राउडसोर्सिंगद्वारे आरोपींची ओळख पटली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. NIA माहिती आणि पुरावे गोळा करण्यासाठी सॅन फ्रान्सिस्को आणि यूकेमधील अधिकाऱ्यांसोबत सक्रियपणे सहकार्य करत आहेत.

दहशतवादविरोधी तपास यंत्रणा खलिस्तानी दहशतवादी संघटनांच्या निधी उभारणीच्या कृतींमध्ये देखील लक्ष घालत आहे. दहशतवादी कारवायांसाठी कोणत्याही आर्थिक मदतीचा मागोवा घेण्याचे आणि ते रोखण्यासाठी प्रयत्न तीव्र करत आहे.

पंजाब पोलिसांनी हिंदुस्थानात खलिस्तानी फुटीरतावादी अमृतपाल सिंगचा देशभर शोध सुरू केल्यानंतर मार्चमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासाची तोडफोड करण्यात आली होती. खलिस्तान समर्थक घोषणा देत आंदोलकांनी वाणिज्य दूतावासाच्या आवारात दोन खलिस्तानी बॅनर लावण्यासाठी सुरक्षा अडथळे तोडले, तसेच लोखंडी रॉडने दरवाजा व खिडक्या फोडल्या होत्या.

2 जुलै रोजी खलिस्तानी समर्थकांनी इमारतीला आग लावली. हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासातील जाळपोळीचे दृश्य दाखवणारे व्हिडिओ देखील ऑनलाइन समोर आले होते आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांनी ते शेअर केले होते.

सॅन फ्रान्सिस्कोमधील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासावरील हल्ल्याच्या संदर्भात एनआयएने यापूर्वी 10 वाँटेड आरोपींचे फोटो जारी केले होते आणि लोकांकडून त्यांच्याबद्दल तपशील मागितला होता.