हिंदुस्थानी क्रिकेट संघाची निवड वेटिंगवर

आयपीएलची रंगत नोव्हेंबरच्या 10 तारखेपर्यंत संपेल. त्यानंतर हिंदुस्थानी क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियन दौऱयावर जायचे आहे. हिंदुस्थानचा संघ या दौऱयात कसोटी, टी-20 तसेच वन डे मालिका खेळणार आहे. जवळपास अडीच महिने रंगणाऱया या मालिकेसाठी अद्याप हिंदुस्थानी क्रिकेट संघाची निवड करण्यात आलेली नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बीसीसीआयला या दौऱयाचे तात्पुरते वेळापत्रक पाठवण्यात आले आहे; पण यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. कारण क्वीन्सलॅण्ड या राज्याकडून अधिकृत परवानगी मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे. कोरोनासंबंधित नियमांबाबत पडताळणी सुरू आहे. यामुळे मात्र हिंदुस्थानी क्रिकेट संघाची निवड वेटिंगवर आहे.

येणाऱया आठवडय़ात निवड समितीची बैठक

हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या सीनियर निवड समितीत लवकरच बदल होणार आहेत, पण त्याआधी ही निवड समिती ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणाऱया टीम इंडियाची निवड करणार आहे. ही निवड त्यांच्याकडून होणारी अखेरची असणार आहे. येणाऱया आठवडय़ात निवड समितीची बैठक होणार असून यामध्ये हिंदुस्थानी क्रिकेट संघाची निवड करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

विलगीकरणाच्या कालावधीमुळे उशीर होतोय

ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनासंबंधितचे नियम कडक आहेत. प्रत्येक राज्यामध्ये विलगीकरणाचे नियमही वेगळे आहेत. त्यामुळे हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील क्रिकेट मालिकेच्या वेळापत्रकाला विलंब होत आहे. पण ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर हिंदुस्थानी संघाला 14 दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागल्यास टीम इंडियाला तेथे लवकर पोहोचणे गरजेचे आहे. हिंदुस्थान- ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी, वन डे व टी-20 या तिन्ही प्रकाराच्या क्रिकेटची मालिका आयोजित करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर इंग्लंडला हिंदुस्थानचा दौरा करावयाचा आहे. त्यामुळे हिंदुस्थानी संघ 12 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या