
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा यशस्वी पार पडावा यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी हिंदुस्थानच्या दोन्ही (पुरुष व महिला) संघांतील क्रिकेटपटूंसाठी ‘बायो बबल’ (जैव सुरक्षित वातावरण) तयार करण्यात आले आहे. या कालावधीत क्रिकेटपटूंना कडक नियमांमध्ये रहावे लागणार आहे. हिंदुस्थानचे दोन्ही संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत.
विराट, रोहीतसह इतर खेळाडू रूममध्येच वर्क आऊट करणार
हिंदुस्थानी कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहीत शर्मा, रवींद्र जाडेजा यांच्यासह आणखी काही क्रिकेटपटू उशिरा ‘बायो बबल’मध्ये दाखल झाले. त्यामुळे जे क्रिकेटपटू 19 मेपासून ‘बायो बबल’मध्ये आहेत त्यांच्यासोबत उशिरा आलेल्या खेळाडूंना भेटता येणार नाही. तसेच एकत्रितपणे वर्क आऊटही करता येणार नाही. याच कारणामुळे विराट अॅण्ड कंपनीला हॉटेलमधील रूममध्येच वर्क आऊट करावा लागणार आहे. या सर्व खेळाडूंना त्यांच्या हॉटेल रूमपर्यंत सुविधा पोहचवण्यात येणार आहेत.
काही खेळाडू 19 मेपासूनच क्वारंटाईन
हिंदुस्थानच्या दोन्ही संघांतील काही खेळाडू 19 मेपासूनच क्वारंटाईन आहेत. यात शुभमन गील, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मयांक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मिताली राज, हरमनप्रीत काwर, शफाली वर्मा, स्मृती मंधाना या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. हे खेळाडू दोन आठवडे क्वारंटाईन राहणार आहेत. तसेच दोन दिवसांमधून एकदा या खेळाडूंना कोरोना चाचणीला सामोरे जावे लागेल.
इंग्लंडमध्येही विलगीकरण
हिंदुस्थानचे खेळाडू 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना दहा दिवसांच्या विलगीकरणात रहावे लागणार आहे. टीम इंडियातील खेळाडूंना तीन दिवस कडक नियमांमध्ये रहावे लागणार आहे. त्यानंतर पुढील सात दिवस खेळाडूंना सराव करण्यास मुभा देण्यात येणार आहे.
दररोज होणार कोरोना चाचणी
हिंदुस्थानी खेळाडूंना हॉटेलमधील रूममध्ये सर्व सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. त्यांच्या रूममध्येच सायकल, डम्बेल्स, बार्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उशिरा ‘बायो बबल’मध्ये आलेल्या खेळाडूंची दररोज कोरोना चाचणी होणार आहे. या कालावधीत कोणत्याही खेळाडूला सराव करता येणार नाहीए.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांना बाहेरचा रस्ता
हिंदुस्थानी खेळाडूंना ‘बायो बबल’मध्ये येण्याआधी कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश बीसीसीआयकडून देण्यात आले होते. कोरोना चाचणीचा रिपोर्ट बघितल्यानंतरच बीसीसीआयकडून खेळाडूंना ‘बायो बबल’मध्ये एण्ट्री देण्यात आली. यापुढेही एखाद्या खेळाडूचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. याचा अर्थ तो इंग्लंड दौऱयाला मुकेल.

























































