
हिंदुस्थानी माहितीपट ‘रायटिंग विथ फायर’ ला ‘ऑस्कर’चे नामांकन मिळाले आहे. या वर्षी ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेली ही एकमेव हिंदुस्थानी फिल्म ठरली आहे.
‘रायटिंग विथ फायर’ चे दिग्दर्शन रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष यांनी केले आहे. त्याला 94 व्या ‘ऑस्कर’ अकादामी पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फीचरचे नामांकन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फीचरसाठी ‘रायटिंग विथ फायर’सोबतच ‘असेन्शन’, ‘एटिका’, ‘फ्ली’ आणि ‘समर ऑफ द सोल’ हे माहितीपटही नामांकित झाले आहेत.
काय आहे विषय
‘रायटिंग विथ फायर’ हा माहितीपट दलित स्त्र्ायांकडून चालवल्या जाणाऱया ‘खबर लहरिया’ वृत्तपत्रावर प्रकाश टाकतो. माहितीपटात ‘खबर लहरिया’ वृत्तपत्राचा प्रिंट ते डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या वृत्तपत्राची सुरुवात 2002 मध्ये दिल्लीतील निरंतर या एनजीओने बुंदेलखंडच्या चित्रकूट येथे केली होती. यामध्ये लैंगिक अत्याचारपीडित, पुरुषप्रधान संस्कृतीविरोधी आवाज, दडपशाही अशा विषयावर लिहिले जाते. ‘रायटिंग विथ फायर’चा प्रीमियर गेल्या वर्षी सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. या फेस्टिव्हलमध्ये या माहितीपटाने ‘द ऑडियन्स अॅवॉर्ड’ आणि ‘स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड’ जिंकले होते. आतापर्यंत माहितीपटाने 20 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.