लोकधन -चिन्हसंकेत आणि लोकपरंपरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. संजय बोरुडे << [email protected] >>

प्रत्येक लोकसंस्कृतीमध्ये चिन्हांना काहीएक अर्थ असतो. ही चिन्हे दोन प्रकारची असतात. शुभचिन्ह आणि अवचिन्ह अर्थात अशुभचिन्ह. या चिन्हांच्या अंकनावर किंवा अंकनांच्या पद्धतीवरून त्यांची शुभाशुभ फळे मिळतात, असे मानले जाते. प्रत्यक्षात ही फळे मिळतात की नाही, हे मोजण्याचे कोणतेही परिमाण उपलब्ध नसले तरी लोकमानसात या चिन्हांना काहीएक स्थान आहे, हे मान्य करावे लागते.

प्रत्येक लोकसंस्कृतीमध्ये चिन्हांना काहीएक अर्थ असतो. ही चिन्हे दोन प्रकारची असतात. शुभचिन्ह आणि अवचिन्ह अर्थात अशुभचिन्ह. या चिन्हांच्या अंकनावर किंवा अंकनांच्या पद्धतीवरून त्यांची शुभाशुभ फळे मिळतात, असे मानले जाते. प्रत्यक्षात ही फळे मिळतात की नाही, हे मोजण्याचे कोणतेही परिमाण उपलब्ध नसले तरी लोकमानसात या चिन्हांना असल्याचे मान्य करावे लागते.

स्वस्तिक हे चिन्ह शुभचिन्ह म्हणून प्रतिष्ठा पावले आहे. अनेक पवित्र ठिकाणी, शुभकार्यामध्ये हे चिन्ह वापरले जाते. जीवनात मंगल भाव आणि आनंद निर्माण करणारे अथवा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे हे चिन्ह आहे. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात हे चिन्ह आढळून आले आहे. यावरून हजारो वर्षांपासून मानवी सभ्यता आपल्या घरांमध्ये, सार्वजनिक स्वरूपाच्या वास्तूंवर हे चिन्ह अंकित करत असल्याचे आढळून येते. सिंधू संस्कृतीच्या मृदभांडय़ावर आणि नाण्यांवर हे चिन्ह आढळते. उदयगिरी आणि खंडगिरीच्या गुहांमध्ये स्वस्तिक चिन्ह आढळते. मोहेंजोदडो, हडप्पा आणि सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये स्वस्तिक आढळते. जैन, बौद्ध आणि ख्रिस्ती धर्मातही स्वस्तिक चिन्हाचा वापर केला गेल्याचे आढळून येते. जैन धर्मात सुपार्थनाथ या तीर्थकरांचे चिन्ह मानले जाते. बुद्धाचे पदचिन्ह म्हणून स्वस्तिकला मान्यता आहे तर ख्रिश्चनांमध्ये क्रॉसचे चिन्ह म्हणजे स्वस्तिक मानले जाते.

हिंदुस्थानातच नव्हे तर जर्मनी, फ्रान्स, इटली, इजिप्त, स्कॅण्डोनेव्हिया, ब्रिटन, अमेरिका, चीन, सिसिली, सायप्रस, स्पेन, सीरिया,जपान इ. अनेक देशांमध्येही स्वस्तिक चिन्हाला महत्त्व आहे. प्राचीन युरोपात सेल्ट नावाच्या संस्कृतीमध्ये स्वस्तिक हे सूर्यदेवतेचे चिन्ह म्हणून वापरले जात होते. इजिप्तमध्ये ओसिसिस या पुनर्जन्माच्या देवतेचे चिन्ह चार हात असणाऱया ताऱयाच्या रूपाने म्हणजेच स्वस्तिक चिन्हाच्या रूपाने दाखवले जाते. पुनर्जन्माचा जवळचा संबंध असणाऱया पिरॅमिडचे चिन्ह क्रॉस किंवा स्वस्तिकसदृश दाखवले जाई. बुल्गेरियात एक उत्खननात 7000 वर्षांपूर्वीच्या मातीच्या कलाकृतींमध्ये स्वस्तिक चिन्ह वापरलेले आढळून आले आहे. मात्र हेच स्वस्तिक चिन्ह उलटे वापरल्याने नाझींचा नाश झाल्याचे मानले जाते. कारण जर्मनीच्या लष्करी गणवेशात टोपीवर, खांद्यावर हे चिन्ह उलटय़ा स्वरूपात वापरले गेले. यावरून स्वस्तिक चिन्हाची दोन्ही फळे कशी मिळतात, हे लक्षात येते.

काही धार्मिक विधीत गहू किंवा तांदूळ यांच्या सहाय्याने चौरंगावर स्वस्तिक काढले जाते. त्यावर एखादा मंगल कलश ठेवला जातो. यातील कलश अथवा कुंभ हेही समृद्धीचे, भरभराटीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच अनेक चित्रांत कुंभ अथवा कलश रेखाटला जातो. या कलशातील आंब्याची पानेही शुभ मानली जातात. अनेक मंदिरांमधल्या स्तंभावर कुंभ कोरलेला दिसतो. धन-धान्य आणि आर्थिक समृद्धी यांचे प्रतीक म्हणजे कुंभ अथवा कलश.

याखेरीज पाने-फुले, कळ्या, ओम, चक्र, हत्ती, मकर, व्याल, शरभ या चिन्हांना काही एक अर्थ आहे. अनेक मंदिरांवर अशी चिन्हे असतात. व्याल हा एक काल्पनिक प्राणी असून तो सिंह, घोडा अशा प्राण्यांचे मिश्रण असलेला प्राणी असतो. कधी कधी त्याला सोंड किंवा पंखही असतात. अनेक इमारतींवर हा प्राणी सुशोभनासाठी वापरला गेलेला आहे. या प्राण्यांतूनच सोंडेचा गणपती, हयग्रीव, वराह, हनुमान आदी देवता उक्रांत झाल्याचे मानले जाते. शरभ हा शैव तथा अनार्य संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. ‘शरभोपनिषद’ हे त्यावरचे स्वतंत्र उपनिषद आहे. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर नरसिंहाचा प्रजेला त्रास वाढल्याने भगवान शंकरांनी शरभाचा अवतार घेऊन नरसिंहाचा बंदोबस्त केला, अशी आख्यायिका आहे. चार पाय, तीक्ष्ण नख्या आणि लांब शेपटी असलेला हा प्राणी शक्ती किंवा सामर्थ्याचे प्रतीक म्हणून अनेक वाडय़ांवर, गढीवर, किल्ल्यांवर अंकित केला जातो. कधी कधी त्याच्या चारही पायांखाली चार हत्ती कोरलेले असतात.

वाईट किंवा अशुभाचे निदर्शक असणारे चिन्ह म्हणजे अवचिन्ह होय. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ या प्रसिद्ध कथेत रात्री चोर अलिबाबाचा त्याच्या घरापर्यंत पाठलाग करतात. त्याचे घर लक्षात ठेवण्यासाठी व त्याला ठार मारण्यासाठी त्याच्या घरावर फुलीचे अवचिन्ह काढतात. रात्री मध्येच अलिबाबाची नौकरानी मार्जियाना बाहेर येते आणि गल्लीतल्या सर्व घरांवर तसेच अवचिन्ह काढते. रत्नाकर मतकरी यांची ‘अवचिन्ह’ नावाची स्वतंत्र गूढकथा आहे.अशा प्रकारे लोकमानसामध्ये रंगसंकेतांबरोबरच चिन्हसंकेत वापरले जातात. त्यामुळे अर्थातच लोकमानस समृद्ध झाले आहे, हे नक्की.

(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)