मातीतले खेळ…पेशवाईत खेळला गेलेला खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळ तोरसकर

बॅडमिंटनला जरी पाश्चात्य खेळ म्हणून ओळखले जात असले तरी त्याची पाळंमुळं पेशवाईच्या उत्तरार्धात सापडतात.

 बॅडमिंटन हा अतिशय दमदार व वेगवान खेळ आहे. बॅडमिंटन हा खेळ ब्रिटिशांचा असला तरी या खेळाचा इतिहास शोधायला गेल्यास त्याची पाळेमुळे थेट हिंदुस्थानात सापडतात. अठराव्या शतकाच्या मध्यावर इंग्रजांच्या राजवटीत हा खेळ इंग्रज अधिकाऱयांनी हिंदुस्थानात खेळण्यास सुरूवात केली. त्यावेळी इंग्रजांच्या आवडत्या शहरांमध्ये विशेषतः पुण्यासारख्या शहरांमध्ये तो वाढला. पूर्वी हा खेळ ‘पुना’ या नावाने ओळखला जात असे. त्याकाळी हिवाळ्यात व पावसाळी वातावरणात हा खेळ हलका चेंडू वापरुन उच्च वर्गातील लोक खेळत असत. नंतर नंतर ते पक्षांच्या पंखांचा वापर केलेल्या फुलाचा वापर करण्याइतपत या खेळाची प्रगती झाली. निवृत्त इंग्रज अधिकाऱयांनी मायदेशी परतताना हा खेळसुध्दा इंग्लंडमध्ये परत नेला. तेथे तो विकसित करून त्याची योग्य अशी नियमावलीसुद्धा तयार केली.

पुढे 1860 मध्ये खेळण्यांशी संबंधित एका एजेंटने (इस्साक स्पॅट) ‘बॅडमिंटन रॅकेट एक नवा खेळ’ या नावाने एक पुस्तक काढले होते. 1873मध्ये या खेळाची नव्या स्वरूपात बॅडमिंटनचा खेळ या नावाने खेळला जाऊ लागला. मात्र 1887पर्यंत हा खेळ पेशवाईच्या उत्तरार्धात प्रचलित असलेल्या नियमांप्रमाणेच खेळला जात होता. बाथ बॅडमिंटन क्लबने या नियमावलीत मोठया सुधारणा करत तो इंग्रजांच्या कल्पकतेत बसेल असे त्याचे स्वरूप केले. त्यात पुढे सुधारणा करत इंग्लंडच्या बॅडमिंटन संघटनेने या खेळाचे नियम बनवले व तेच नियम आजच्या आधुनिक नियमांशी मिळते जुळते आहेत. इंग्लंडमध्येच 1899 साली पहिली अधिकृत खुली बॅडमिंटन स्पर्धा सुरू झाली. आज जरी हा खेळ बंदिस्त जागेत किंवा मोकळ्या मैदानात आधुनिक साहित्यानिशी खेळला जात असला तरी पूर्वी तो खेळण्यासाठी वह्याच्या किंवा पॅडलच्या आकाराची थापीवजा फळीने चपटय़ा बुचाची चकती इकडून तिकडे टोलवीत असत. हवेतून जाताना बुचाची चकती स्पष्ट दिसावी म्हणून पक्ष्यांची पिसे चिटकवलेली असतात. या चेंडूवजा वस्तूला ‘बर्ड’ किंवा ‘येरझारा घालणारा कोंबडा’ असेही संबोधले जाते.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेची (आयबीएफ) स्थापना 1934 साली झाली. मात्र पुढे ‘बॅडमिंटन जागतिक संघटना’ असे त्याचे नामकरण होऊन 1936 साली हिंदुस्थानाला सदस्य म्हणून मान्यता मिळाली व तो कॅनडा, डेन्मार्क, इंग्लंड, फ्रांस, नेदरलँड, आयर्लंड, न्यूझिलंड, स्कॉटलंड व वेल्स यांच्या पंगतीत जाऊन बसला. आजकाल बॅडमिंटन जागतिक संघटनाच सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करते व या खेळाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य करीत आहे. जरी हा खेळ इंग्लंडमध्ये फुलला व प्रसारित झाला असला तरी या खेळावर पारंपारिक वर्चस्व हे डेन्मार्कचेच आहे. दक्षिण कोरिया, इंडोनेशिया व मलेशिया या देशांनी गेल्या काही दशकांत वर्चस्व मिळवून जागतिक दर्जाचे उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू या खेळला दिले असून या खेळाडूंनी एक प्रकारचा दबदबाच निर्माण केला होता. अलीकडच्या काळात या खेळावर चीनने प्रचंड वर्चस्व निर्माण केले असून सातत्याने उच्च दर्जाचे खेळाडू निर्माण केले आहेत. या स्पर्धेत आता हिंदुस्थाननेही उडी घेतली असल्याचे प्रकर्षाने जाणवते. आपले काही खेळाडू सातत्याने उच्च दर्जाचा खेळ करत असून जागतिक स्तरावर ठसा उमटवताना दिसतं आहेत. त्यात प्रकाश पडूकोण, पुलेला गोपिचंद यांनी हिंदुस्थानला एक मानाचे स्थान मिळवून दिले व त्यानंतर आता सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधु, श्रीकांत, प्रनोय कुमार, ज्वाला, अश्विनी आदी खेळाडूंनी हिंदुस्थानची पताका फडकावत ठेवली आहे.

बॅडमिंटन या खेळाचा 1972च्या ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश केला होता. मात्र या खेळाचा 1992च्या बार्सेलोना ऑलिंपिकपासून प्रमुख खेळांमध्ये समावेश केला गेला. त्यावेळी पुरुष-महिलांचे एकेरी व दुहेरीचे सामने आयोजित केले गेले व त्यात इंडोनेशियाने एकेरीची दोन्ही सुवर्ण पदके मिळवली तर दुहेरीतील दोन्ही सुवर्ण पदके द. कोरियाने मिळवत बॅडमिंटन खेळाच्या विश्वावर नाव कोरले होते. हिंदुस्थानला मात्र ऑलिंपिक पदकासाठी 2012पर्यंत वाट पाहावी लागली. 1912ला महिलांमध्ये सायनाने कांस्य पदक तर 1916च्या ऑलिंपिक सिंधूने रजत पदक मिळवून दिले आहे.

बॅडमिंटन हा अतिशय दमदार व वेगवान खेळ आहे. या खेळासाठी विजेची चपळता अंगी लागते व त्याच्या जोडीला तीक्ष्ण नजरही लागते. हा खेळ कोणीही व कोणत्याही वयात खेळू शकतात. स्त्री-पुरुष, मुले-मुली, वृद्ध व्यक्तीही हा खेळ खेळू शकतात. या खेळामुळे शरीराला भरपूर व्यायाम तर मिळतोच, त्याच बरोबर हरणाची चपळता अंगी बाणते.