
दिल्लीच्या एका खासगी कंपनीने आंतरराष्ट्रीय आणि हिंदुस्थानातील काही खेळाडूंना एकत्र आणत Indian Heaven Premier League (IHPL) चे आयोजन केले होते. 32 माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू या लीगमध्ये सामील होणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली होती. षटकारांचा बातशाहा क्रिस गेलसुद्धा लीग खेळण्यासाठी हिंदुस्थानात आला आणि मैदानात सुद्धा उतरला. 8 नोव्हेंबरला स्पर्धेची फायनल खेळली जाणार होती. मात्र, रविवारी (2 नोव्हेंबर 2025) रात्रीपासून लीगचे आयोजक श्रीनगरमधून गायब झाल्याचा, आरोप केला जात आहे. यामुळे काही विदेशी खेळाडू हॉटेलमध्ये अडकल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या एका खासगी कंपनीने या लीगचे आयोजन केले होते. ज्या हॉटेलमध्ये खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था केली होती, त्या हॉटेलचे 80 लाखांहून अधिक रुपयांचे बील थकीत आहे. 9 नोव्हेंबरपर्यंत हॉटेलमधील खोल्या बुक करण्यात आल्याची माहिती यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्याने दिली. मात्र, याचा एकही रुपया दिला नसल्याचे सुद्धा ते म्हणाले आहेत. या स्पर्धेत एकूण आठ संघांचा समावेश होता. यामध्ये क्रिस गेल, प्रवीण कुमार, थिसारा परेरा सारख्या दिग्गज माजी खेळाडूंचा समावेश होता. क्रिस गेलसह काही खेळाडू 1 नोव्हेंबरलाच हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. खेळाडूंनी आणि सामना अधिकाऱ्यांनी आयोजक रातोरात पळून गेल्याचा आरोप केला आहे.




























































