हिंदुस्थानी हॉटेल इंडस्ट्रीलाही कोरोनाचा फटका! आयएचसीएलचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनसह जगभरात हाहाःकार माजवणाऱया जीवघेण्या कोरोना विषाणूचा फटका हिंदुस्थानी हॉटेल इंडस्ट्रीला देखील बसणार आहे. त्याचे परिणाम आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत पाहायला मिळतील, असे टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनीच्या (आयएचसीएल) अहवालात म्हटले आहे.

कोरोनाच्या धसक्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम या आर्थिक वर्षाच्या तिमाहीपेक्षा पुढच्या आर्थिक वर्षात जास्त पाहायला मिळतील, असे आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत छटवाल म्हणाले. आर्थिक मंदीचा फटका, जेट एअरवेज बंद पडणे, निवडणुका, दिल्लीतील मोर्चे आदींचा फटका देखील हॉटेल व्यवसायांना बसल्याचे अहवालात नमूद आहे.

2020-21 मध्ये प्रत्येक महिन्यात एकाहून अधिक हॉटेल सुरू करण्याचे आयएचसीएलचे लक्ष्य आहे. कंपनीच्या हॉटेलची संख्या 200 वर पोहोचली असून त्यात 25 हजारांहून अधिक रुम्स आहेत. गेल्या दोन वर्षात कंपनीने आपल्या समूहात 50 नवीन हॉटेल्स जोडले आहेत.