हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट खेळाडू रोहिणी कलम घरात मृतावस्थेत आढळली, क्रीडा विश्वात खळबळ

आशियाई स्पर्धांमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणारी आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट खेळाडू रोहिणी कलम (वय – 35) ही घरात मृतावस्थेत आढळली आहे. मध्य प्रदेशमधील राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृततेह सापडला. यामुळे एकच खळबळ उडाली असून तिने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रोहिणी मध्य प्रदेशमधील देवास शहरातील अर्जून नगर भागात राहत होती. रविवारी धाकटी बहीण रोशनी हिला तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर रोहिणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही घटना घडली तेव्हा रोहिणीची आई तिसऱ्या मुलीसोबत देवदर्शनासाठी बाहेर गेली होती, तर वडील कामासाठी घराबाहेर गेले होते, अशी माहिती रोशनीने दिली.

रोहिणी आष्टा येथे एका खासगी शाळेमध्ये मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत होती. शाळेत काहीतरी घडल्याने ती अस्वस्थ होती, अशी माहितीही रोशनीने दिली. शनिवारी नेहमीप्रमाणे ती घरी आली. सकाळी तिने चहा-नाश्ता केला आणि कुणासोबत तरी फोनवरून संवादही साधला. त्यानंतर तिच्या खोलीत गेली आणि आतून कडी लावून घेतली. तिथेच तिने गळफास घेतला.

रोहिणीचे वडीलही खेळाडू असून निवृत्त कर्मचारी आहेत. रोहिणी चार बहि‍णींमध्ये सर्वात मोठी होती. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले असून घटनास्थळी कोणतीही सुसाईट नोटही आढळून आलेले नाही. बँक नोट प्रेस पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

रोहिणी हिने हांगझोऊमध्ये झालेल्या 19 व्या आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. बर्मिंघममध्ये आयोजित जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेली ती एकमेव हिंदुस्थानी खेळाडू होती. तिने अनेक स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.