
अमेरिकेने इराणचा टॉपचा कमांडर कासिम सुलेमानी याचा क्षेपणास्त्र हल्ल्यात खात्मा केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेच्या कारवाईनंतर चवताळलेल्या इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणने हल्ला केला आणि यात अमेरिकेचे सैनिक मारल्याचा दावा केला. परंतु बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत हा दावा फेटाळून लावला. असे असले तरी अमेरिकेने इराणची आर्थिक नाकेबंदी करण्याकडे पावलं उचलणार असल्याचे घोषित केले. या दोन देशांच्या तणावाचा थेट प्रभाव इतर देशांसह हिंदुस्थानवरही पडणार आहे.
अमेरिका आणि इराण आमनेसामने आल्याने जगावर तिसऱ्या युद्धाचा धोका घोंगावत आहे. त्यामुळे हिंदुस्थानने देखील मोठे पाऊल उचलले आहे. हिंदुस्थानच्या नौदलाने खाडी परिसरात युद्धपोत आणि विमानांची तैनाती केली आहे. समुद्रातून होणाऱ्या व्यापाराची आणि दोन्ही देशातील तणावाच्या स्थितीत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इराण-अमेरिकेतील तणाव वाढणार, ट्रम्प यांचा आर्थिक नाकेबंदीचा इशारा
हिंदुस्थानी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खाडीमध्ये जंगी जहाज आणि विमानांची तैनाती करण्यात आली आहे. यामागे हिंदुस्थानी व्यापाऱ्यांना तुम्ही आश्वस्त करण्याचा मनसुबा आहे. आम्ही कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. खाडी परिसरात होणाऱ्या प्रत्येक घटनेवर आम्ही बारीक लक्ष ठेऊन आहोत. नौदल हिंदुस्थानच्या समुद्री सुरक्षेसाठी कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले. ‘दै. भास्कर‘ने याबाबत वृत्त दिले आहे.




























































