हिंदुस्थानची ताकद आणखी वाढणार! अत्याधुनिक ‘उदयगिरी’ आणि ‘हिमगिरी’ युद्धनौका नौदलात होणार सामील

हिंदुस्थानी नौदलाची ताकद वाढणार आहे. नौदलातच्या ताफ्यात 26 ऑगस्ट 2025 रोजी दोन अत्याधुनिक स्टील्थ फ्रिगेट्स, ‘उदयगिरी’ (F35) आणि ‘हिमगिरी’ (F34), सामील होणार आहेत. देशातील दोन प्रमुख शिपयार्ड्समध्ये बांधलेल्या या युद्धनौकांचे एकाच वेळी कमीशनिंग होणार आहे. यांच्या समावेशामुळे हिंद महासागरातील हिंदुस्थानची सामरिक ताकद आणखी वाढणार आहे.

‘उदयगिरी’ आणि ‘हिमगिरी’ची वैशिष्ट्ये

उदयगिरी ही फ्रिगेट मुंबईतील मझगांव डॉक शिपबिल्डर्सने बांधली आहे. तर हिमगिरी कोलकात्यातील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सने तयार केली आहे. विशेष म्हणजे, ‘उदयगिरी’ हे नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोचे 100 वे डिझाइन केलेले जहाज आहे. याचे वजन सुमारे 6,670 टन आहे. यांचे स्टील्थ डिझाइन रडारवर कमी दिसण्यासाठी विशेष रडार-शोषक सामग्री (Radar Absorbent) आणि कोनात्मक रचना वापरते, ज्यामुळे शत्रूला त्यांचा शोध घेणे कठीण होते.

या युद्धनौकांमध्ये शस्त्र संचामध्ये सुपरसॉनिक जमिनीवरून मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, 76 मिमी एमआर तोफा, 30 मिमी आणि 12.7 मिमी क्लोज-इन वेपन सिस्टीम आणि अँटी-सबमरीन/अंडरवॉटर वेपन सिस्टीमचा समावेश आहे. या जहाजांवर MH-60R रोमियो किंवा सी किंग हेलिकॉप्टर तैनात करता येऊ शकतात, जे पाणबुडी आणि सतही जहाजांचा शोध घेण्यासाठी उपयुक्त आहेत.