अधिक तास काम करण्यात कष्टाळू हिंदुस्थानीच ‘शेर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी कामगारांना अभिमान वाटावी अशी बातमी एका जागतिक पाहणी अहवालात समोर आली आहे. या सर्व्हेनुसार जगात आठवडय़ाला कष्ट घेत अधिक तास काम करण्याचा विक्रम हिंदुस्थानी कामगारांनी साकारलाय. 20 वर्षांपूर्वी हिंदुस्थानी श्रमिक आठवडय़ाला 39 तास काम करायचे. आता हीच संख्या प्रतिसप्ताह 45 तासांवर गेली आहे. मुंबई आणि दिल्लीचे कामगार तर आठवडय़ाला 60 तास काम करण्याचा पराक्रम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशांत मात्र तेथील कामगार आठवडय़ाला 33 -34 तासांहून अधीक काम करतच नाहीत, असे उघड झाले आहे.

अमेरिका आणि अनेक युरोपियन देशांनी कामगारांना मानसिक व शारीरिक विश्रांती मिळावी म्हणून आठवडय़ाचे पाच दिवस काम आणि दोन दिवस विश्रांती असा नवा फंडा अमलात आणला आहे. त्यामुळे या देशांतील कामगारांचे कामाचे साप्ताहिक तास कमी झाले आहेत.

आइसलँड, स्पेन आणि न्यूझीलंडच्या काही कंपन्यांनी तर चार दिवसांचा कामाचा आठवडा सुरू केला आहे. त्यामुळे इथे कामगारांचे प्रतिसप्ताह कामाचे तास दिवशी 9 तास या हिशेबाने आठवडय़ाला 35 ते 36 तास होतात. 1970मध्ये हिंदुस्थानी कामगार वर्षाला 2077 तास काम करायचे. आता 2020मध्ये हिंदुस्थानी कामगारांचे तास आठवडय़ाला 39 तासांवरून 45 तासांवर गेले आहेत. विशेष म्हणजे वर्षभरात अधिक तास काम करणाऱया जगातील टॉप 7 देशांत कंबोडिया, बांगलादेश आणि चीनपाठोपाठ हिंदुस्थान चौथ्या स्थानी आहे.

सर्वाधिक तास काम करणारी जगातील 5 टॉप शहरे

                            साप्ताहिक कामाचे तास       कामाचे वार्षिक तास
मुंबई (हिंदुस्थान)               63-64                          3315
हनोई (व्हिएतनाम)             51-52                          2691
मेक्सिको                        50-51                          2622
नवी दिल्ली (हिंदुस्थान)        48-49                          2511
बोगोटा (कोलंबिया)            45-46                          2357