अफगाणिस्तानमध्ये हिंदुस्थानच्या ‘पुलित्झर’ पुरस्कार विजेत्या पत्रकाराची हत्या, केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला शोक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेने सैन्य काढून घेतल्यापासून अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. तालिबानने अनेक मोक्याची ठिकाणे ताब्यात घेतल्या असून येथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. याच दरम्यान कंधार प्रांतात कव्हरेजसाठी गेलेल्या हिंदुस्थानी  ‘पुलित्झर’ पुरस्कार विजेत्या फोटो जर्नलिस्टची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. दानिश सिद्दीकी असे या फोटो जर्नलिस्टचे नाव आहे. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दानिश सिद्दीकी यांची गिनती जगातील चांगल्या फोटोग्राफरमध्ये होत होती. ते सध्या आंतरराष्ट्रीय संस्था Reuters साठी काम करत होते आणि अफगाणिस्तानमध्ये उसळलेला हिंसाचार कव्हर करण्यासाठी ते येथे गेले होते. कंधारमधील स्पिन बोल्डन भागात हिंसाचार कव्हर करताना त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली.

दरम्यान, फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून नुकतेच अफगाणिस्तानमधील काही फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले होते. बेभान झालेल्या गर्दीने त्यांच्या ताफ्यावरही हल्ला केला होता आणि याचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला होता.

अनुराग ठाकूर यांचं ट्वीट

दरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करत पुलित्झर पुरस्कार विजेत्या दानिश सिद्दीकाला श्रद्धांजली वाहिली. दानिश सिद्दीकी यांनी काढलेला एक फोटोही त्यांनी शेअर केला.

तालिबानला सापडले 3 अब्जांचे घबाड

‘हरामाला खुदा बेजार’ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय नुकताच अफगाणिस्तानात परतून आपला दहशतवादी पाया भक्कम करणाऱ्या तालिबानी फौजेला आला आहे. पाकिस्तान सीमेनजीकच्या एका अफगाणी सैन्याने सोडून दिलेल्या लष्करी चौकीत तालिबानी फौजेला तब्बल 3 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे घबाड सापडले आहे. पाकिस्तान सीमेच्या लगत असलेल्या कंदाहार प्रांतातील स्पिन बोल्डाक भागातील एका सीमा चौकीवर तालिबानने ताबा मिळवला. ही चौकी ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांचे नशीब फळफळले. तालिबानींच्या हाती तीन अब्ज पाकिस्तानी रुपये सापडले आहेत. ही रक्कम अफगाण जवान सोडून पळाले. तालिबानने एका प्रसिद्धीपत्राद्वारे ही माहिती दिली.