महाराष्ट्राच्या मृण्मयी, परमिंदरचे सुवर्णयश, आशियाई इनडोअर रोइंग स्पर्धेत हिंदुस्थान अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पुणे

बँकॉक येथे नुकत्याच झालेल्या आशियाई इनडोअर रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. हिंदुस्थानने सात सुवर्ण, पाच रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण 15 पदकांची कमाई केली. पदकतालिकेत हिंदुस्थानी संघ अक्कल स्थानावर राहिला, तर जपानने 4 सुवर्ण, 3 रौप्य, 3 कांस्य असे एकूण 10 पदकांसह दुसरे स्थान मिळकले. यात महाराष्ट्राच्या परमिंदर इंदरपालसिंग आणि मृण्मयी नीलेश साळगावकर यांनी पदकविजेती कामगिरी केली.

यात परमिंदरने पुरुष एकेरी अणि पुरुष दुहेरीत सुवर्णपदक मिळवले, तर त्याने ज्युनियर गटात मिक्स फोरमध्ये रौप्यपदक पटकावले. नाशिकच्या मृण्मयीने ज्युनियर मुलींच्या दुहेरीत, तर ज्युनियर मिक्स फोरमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर ज्युनियर मुलींच्या एकेरीत तिने रौप्यपदक पटकावले. यात पुरुष दुहेरीच्या 2000 मीटरमध्ये हिंदुस्थानच्या परमिंदरसिंग आणि बलविंदरसिंगने 6 मिनिटे 14.5 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. ज्युनियर मुलीच्या एकेरीतील 2000 मीटरमध्ये अविनाश कौरने (7 मि. 43.4 से.) सुवर्ण, तर मृण्मयी साळगावकरने (7 मि. 47.2 से.) रौप्यपदकाची कमाई केली.

मिक्स फोर 500 मीटरमध्ये हिंदुस्थानच्या परमिंदरसिंग, बलविंदरसिंग, नवनीत कौर, मयूराक्षी मुखर्जी यांनी (1 मि. 32.1 से.) रौप्यपदक पटकावले. ज्युनियर मुलींच्या दुहेरीच्या 2000 मीटरमध्ये हिंदुस्थानच्या अविनाश कौर आणि मृण्मयी साळगावकर या जोडीने 7 मिनिटे 51.5 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णयश खेचून आणले. ज्युनियर मिक्स फोर 500 मीटर प्रकारात हिंदुस्थानच्या प्रतीक गुप्ता, अविनाश कौर, शागनदीपसिंग, मृण्मयी साळगावकर या चौकडीने 1 मिनिट 34.0 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णयश पटकावले.

पुरुष एकेरीच्या 2000 मीटरमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी वर्चस्व राखले. यात परमिंदरसिंगने (6 मि. 12.4 से.) सुवर्ण, तर बलविंदरसिंगने (6 मि. 13.3 से.) रौप्यपदक पटकावले. परमिंदरसिंगची ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळ ठरली. परमिंदर आणि मृण्मयी यांच्याकडून महाराष्ट्र राज्य रोइंग असोसिएशनला मोठी अपेक्षा आहे. यापूर्वी मृण्मयी आणि परमिंदर यांनी या वर्षी फेब्रुवारीत पुद्दुचेरीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्याचबरोबर पुण्यात जानेवारीत झालेल्या राज्य इनडोअर रोइंग स्पर्धेतही या दोघांनी चमक दाखवली होती.