हृदयरोग, किडनी विकार, कर्करोगाच्या रुग्णांपाठोपाठ देशात ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. देशात प्रत्येक वर्षी 18 लाख नवे रुग्ण ब्रेन स्ट्रोकचे आढळून येत आहेत. त्यापैकी सुमारे 30 टक्के रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होत आहे. प्रत्येक 20 मिनिटाला देशात एक रुग्ण ब्रेन स्ट्रोकचा आढळून येत असून प्रत्येक तासात चार जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. दिवसभरात सुमारे 96 जणांचा ब्रेन स्ट्रोकमुळे बळी जात असल्याने इंडियन स्ट्रोक असोसिएशनने सामान्य डॉक्टर आणि नागरिकांना प्रशिक्षित करण्यासाठी मिशन ब्रेन अॅटॅक हा उपक्रम हाती घेतला आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांचे प्रमाण विजेच्या वेगाने वाढत चालले आहे. हे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी इंडियन स्ट्रोक असोसिएशन, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स, अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन्स आणि एमक्युअर फॉर्मास्युटीक यांच्या संयुक्त विद्यमानाने मिशन ब्रेन अॅटॅक हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सर्वसामान्य डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी नेरुळ येथील मेरिओट कॉर्टयार्ड हॉटेलमध्ये एक विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना इंडियन स्ट्रोक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निर्मल सूर्या म्हणाले की देशात ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.
बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल नियमित तपासा
हृदयविकाराची लक्षणे लवकर दिसतात. त्यामुळे रुग्ण काळजी घेतो. त्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकचे लक्षण लवकर दिसून येत नाही. काहीच दुखत नसल्यामुळे नागरिक आवश्यक ती काळजी घेत नाहीत आणि तिथेच घात होतो. ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी बीपी, शुगर आणि कोलेस्ट्रॉलची चार महिन्यांतून एकदा तपासणी करून घ्या. जर बीपी आणि शुगरची औषधे सुरू असतील तर ती थांबवू नका, ती नियमित घ्या. फास्टफूड आणि तेलकट खाणे टाळा, असा सल्लाही यावेळी ज्येष्ठ न्युरोसर्जन निर्मल सूर्या यांनी दिला.
– या रुग्णांना चार तासांत उपचार मिळाले तर त्यांचा जीव वाचवता येऊ शकतो. मात्र वेळेत उपचार होत नसल्याने देशात प्रत्येक वर्षी सुमारे पाच लाख नागरिकांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू होत आहे.
– हे प्रमाण कमी करण्यासाठी सामान्य डॉक्टरांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम असोसिएशनने हाती घेतला आहे. आतापर्यंत देशभरात 10 प्रशिक्षण उपक्रम झाले आहेत.
– या उपक्रमाला डॉक्टरांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. याप्रसंगी डॉ. पवन आहुजा, डॉ. पी. विजया, डॉ. आनंद अरुलकर, सलील उप्पल आदी उपस्थित होते.