
अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात हिंसक निदर्शने सुरू असतानाच एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याला अत्यंत अमानुष पद्धतीने वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यूयॉर्क विमानतळावर विद्यार्थ्याच्या हाताला बेडय़ा बांधून जमिनीवर फेकण्यात आले. पोलिसांनी त्याचा गुन्हेगारापेक्षा भयंकर छळ केला. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून अमेरिकेविरुद्ध सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन व्यापारी कुणाल जैन यांनी विद्यार्थ्याच्या छळाचा व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला आणि हिंदुस्थान सरकारला यात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर प्रचंड अन्याय केला जात असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘मी गेल्या रात्री हिंदुस्थानी विद्यार्थ्याला न्यूयॉर्क विमानातळावर आणल्याचे पाहिले. त्याच्या हातात बेडय़ा बांधलेल्या होत्या. तो जोरजोरात ओरडत होता. त्याला गुन्हेगारापेक्षा भयंकर वागणूक दिली.
लॉस एंजेलिसमध्ये तणाव
अमेरिकेचे इमिग्रेशन धोरण तसेच सीमाशुल्क संचालनालयाच्या कारवाईविरुद्ध हिंसाचाराचा भडका उडाला आहे. मागील तीन दिवसांपासून हजारो लोक रस्त्यावर उतरून ट्रम्प सरकारविरोधात हिंसक निदर्शने करीत आहेत. त्यामुळे लॉस एंजेलिसमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर सुरू केला आहे.
मोदी सरकार अपयशी
अमेरिकेतील हिंदुस्थानी नागरिक व विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुस्थान व पाकिस्तानमधील शस्त्रसंधी तसेच अमेरिकेतील हिंदुस्थानी नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारावर बोलण्याचे धाडस करू शकलेले नाहीत. मोदींनी ही हिंमत दाखवून विद्यार्थ्यांचा छळ थांबवण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे.