किर्गिस्तानात हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर हल्ले, बलात्कार तरीही मोदी सरकार म्हणते परिस्थिती सामान्य आहे!

किर्गिस्तानात हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत, विद्यार्थिनींवर बलात्कार होत आहेत. रस्त्यावर विद्यार्थ्यांना गाठून जबर मारहाण केली जात असल्याचे समोर आले आहे. असे असतानाही हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मात्र किर्गिस्तानातील परिस्थिती सर्वसामान्य असल्याचे म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. त्यामुळे किर्गिस्तानात अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मोदी सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 13 मे रोजी हिंसाचार भडकला असून प्रामुख्याने हिंदुस्थान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. एक आठवडय़ापूर्वी चोरी, मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे हिंसाचार भडकल्याचे वृत्त आहे.

मंत्र्यांना ट्विट, मेल केले, पण उत्तर मिळाले नाही

आम्ही वसतिगृह सोडून कुठेच जाऊ शकत नाही, तर विमानतळावर पोहोचलेले विद्यार्थी तेथून कुठेही जाऊ शकत नाहीत. आम्ही किर्गिस्तानात अत्यंत भयंकर स्थितीत जगत असून याबाबत सर्व मंत्र्यांना ट्विट आणि मेल केले. परंतु, कुणाकडूनही अद्याप उत्तर मिळाले नसल्याचे सुरतची विद्यार्थिनी रिया लाठिया हिने हिंदुस्थानातील एका वृत्तवाहिनीशी ऑनलाइनच्या माध्यमातून बोलताना सांगितले. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इथे सर्व काही ठीक असल्याचे म्हटले आहे. पण, आम्हालाच माहिती आमच्यावर काय प्रसंग आला आहे, हिंदुस्थान सरकारने आम्हाला मदत करावी, अशी विनवणीही रियाने केली आहे.