
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत हिंदुस्थानचा टेनिसपटू युकी भांबरीने ग्रॅण्डस्लॅम कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनससोबत जोडी जमवून भांबरीने अनुभवी प्रतिस्पर्ध्यांवर दणक्यात विजय मिळवला आणि जेतेपदाच्या शर्यतीत प्रवेश केला.
पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत युकी भांबरी-मायकेल व्हीनस जोडीने क्रोएशियन निकोला मेकटिच आणि अमेरिकन राजीव राम या दिग्गज जोडीला सरळ सेटमध्ये पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये आक्रमक खेळ करत भांबरी-व्हीनसने 6-3 अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये जोरदार संघर्ष झाला. मात्र निर्णायक क्षणी टायब्रेकमध्ये (7-6, 8-6) भांबरी-व्हीनसने बाजी मारली. तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा 6-3 असा विजय मिळवत त्यांनी अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित केले.
ग्रॅण्डस्लॅममधील सर्वोत्तम कामगिरी
33 वर्षीय युकी भांबरीने आपल्या कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी अल्बानो ओलिवेटी याच्यासोबत खेळताना त्याचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच थांबला होता. त्यामुळे या वेळी उपांत्य फेरीत विजय मिळवून अंतिम फेरीत पोहोचण्याची आणि नवा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे आहे.
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दोन अमेरिकन
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत एरिना सबालेंका विरुद्ध अमेरिकेची जेसिका पेगुला, तर अमेरिकेची अमांडा ऑनिसिमोव्हा जपानच्या नाओमी ओसाकाशी भिडेल. या स्पर्धेत दोन्ही उपांत्य लढतीत अमेरिकन महिला जिंकल्या, तर पुन्हा ऑल अमेरिकन फायनल रंगू शकते. तसेच पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोविच- कार्लोस अल्कराझ आणि यानिक सिनर-फेलिक्स ऑगर अलायसिम अशा उपांत्य झुंजी होणार आहेत.
ऐतिहासिक विक्रमाची संधी
आता उपांत्य फेरीत या जोडीसमोर नील स्कूप्स्की आणि जो सॅलिसबरी या अनुभवी इंग्लिश जोडाचे आव्हान असेल. हिंदुस्थानच्या टेनिस इतिहासात आजवर एकाही खेळाडूला पुरुष दुहेरीत ग्रॅण्डस्लॅम किताब मिळवता आलेला नाही. मिश्र दुहेरीत मात्र महेश भूपती, लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांनी आपल्या दमदार कामगिरीने हिंदुस्थानचा झेंडा उंचावला आहे. जर भांबरीने ही मोहीम यशस्वी केली, तर पुरुष दुहेरीत जेतेपद पटकवणारा पहिला हिंदुस्थानी टेनिसपटू ठरेल.




























































