हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील संघाच्या ६१३ धावा, श्रीलंकन संघाच्या ४ बाद १४० धावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, हंबनटोटा 

अथर्व तायडेने १७७ धावांची जबरदस्त खेळी केल्यानंतर पवन शहा या पुणेकराने बुधवारी डबल धमाका केला. त्याने २८२ धावांची दमदार खेळी करताना श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघातील गोलंदाजांची पिसे काढली. हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील संघाने येथे सुरू असलेल्या दुसर्‍या चारदिवसीय युथ कसोटीत ८ बाद ६१३ धावांचा डोंगर उभारला. श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघाने दुसर्‍या दिवसअखेरीस ४ बाद १४० धावा केल्या असून आता त्यांचा संघ ४७३ धावांनी पिछाडीवर आहे.

हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील संघाने ४ बाद ४२८ या धावसंख्येवरून दुसर्‍या दिवशी पुढे खेळायला सुरुवात केली. पवन शहा याने बुधवारीही आपली दमदार फलंदाजी सुरूच ठेवली. त्याचे त्रिशतक १८ धावांनी हुकले. पवन शहाने २८२ धावांच्या खेळीत १ षटकार व ३३ चौकारांची बरसात केली. निहाल वाधेराने ६४ धावांची फटकेबाजी केली. दरम्यान, श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघाला अवघ्या ३४ धावांवर ३ धक्के बसले. मोहित जांगडाने ४३ धावा देत ३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अर्जुन तेंडुलकरला एकही फलंदाज बाद करता आला नाही. यजमान संघाकडून पसिंदू बंदारा ५१ धावांवर खेळत आहे.