कबुतरांना खाद्य देणाऱ्या हिंदुस्थानी महिलेला सिंगापूरमध्ये अटक

सिंगापुरात घराजवळ कबुतरांना बेकायदेशीरपणे खायला घातल्याबद्दल एका 70 वर्षीय हिंदुस्थानी महिलेला 1200 सिंगापूर डॉलर एवढा (930 अमेरिकन डॉलर) दंड ठोठावण्यात आला. शन्मुगमनाथन शामला असे त्यांचे नाव असून त्यांना वन्यजीव कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले. शामला यांना लोरोंग लेन 4 तोआ पायोह येथील घराजवळून अटक करण्यात आली. 11 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय उद्यान मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शन्मुगमनाथन शामला यांना पक्ष्यांना दाणे टाकताना अडवले. इशारा दिल्यानंतरही त्या नोव्हेंबर 2024 पर्यंत अनेकदा पक्ष्यांना खाद्य देत राहिल्या. 19 फेब्रुवारी रोजी शामला यांनी त्यांच्या घराजवळ कबुतर पकडण्याच्या सरावात राष्ट्रीय उद्यान मंडळाच्या एनपार्क्सच्या अधिकाऱ्यांना अडथळा आणला आणि त्यांना हा सराव सोडून देण्यास भाग पाडले, असे एनपार्क्सच्या अभियोक्ता लिम चोंग हुई यांनी सांगितले.