हिंदुस्थानी महिलांचा सलग पाचवा पराभव, इंग्लंडने पहिला ट्वेण्टी-20 सामना जिंकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुवाहाटी

वन डे मालिका जिंकणाऱ्या हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाला येथे झालेल्या पहिल्याच ट्वेण्टी-20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या महिला संघाने हा सामना 41 धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हिंदुस्थानी महिला संघाला सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय ट्वेण्टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय.

इंग्लंडकडून मिळालेल्या 161 धावांचा पाठलाग करणाऱया हिंदुस्थानला 6 बाद 119 धावांपर्यंतच मजल मारता आली. शिखा पांडेने नाबाद 23 व दीप्ती शर्माने नाबाद 22 धावा केल्या. इंग्लंडकडून कॅथरीन ब्रुण्ट व लिनसे स्मिथ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सांगलीच्या स्मृती मंधानाकडे हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. यावेळी हिंदुस्थानी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. डॅनियल वॅटने 35 धावांची, टॅमी ब्युमॉण्टने 62 धावांची आणि कर्णधार हेथर नाईटने 40 धावांची खेळी साकारली. त्यामुळे इंग्लंडला 160 धावा उभारता आल्या.

झुलन, मिताली एकाच वेळी ‘नंबर वन’

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या एकदिवसीय क्रमवारीत हिंदुस्थानने सात वर्षांपूर्वीच्या अव्वल कामगिरीची पुनरावृत्ती केली. फलंदाजी क्रमवारीत मराठमोळ्या स्मृती मानधना हिने ‘नंबर वन’चे सिंहासन अबाधित राखले, तर गोलंदाजीमध्ये अनुभवी झुलन गोस्वामीने अव्वल स्थानावर झेप घेतली. तब्बल सात वर्षांनंतर हिंदुस्थानने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये ‘नंबर वन’च्या यशाचा धमाका केला. याआधी 2012 मध्ये मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अव्वल स्थान मिळकले होते.