
सलामीची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधनाने केलली 116 धावांची झंझावाती शतकी खेळी आणि स्नेह राणाने 38 धावांत चार विकेट टिपत हिंदुस्थानी संघाला तिरंगी क्रिकेट मालिकेच्या अंतिम सामन्यात 97 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. आज चमकलेली मानधना अंतिम सामन्याची मानकरी ठरली तर 15 विकेट टिपणार्या स्नेह राणाने मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवला.
हिंदुस्थानी महिला संघाने दिलेले 343 धावांचे आव्हान यजमान श्रीलंकन संघाला पेलवलेच नाही. अमनजोत काैरने आपल्या पहिल्याच षटकांत हसिनी परेराची शून्यावरच विकेट काढत सनसनाटी सुरुवात केली. त्यानंतर श्रीलंकेच्या आघाडीवीरांनी चांगला खेळ केला. पण चौथी विकेट पडल्यानंतर लंकन डावाला कुणीही भरभक्कम आधार देऊ शकली आणि हिंदुस्थानी महिलांनी जेतेपदाच्या दिशेने झेप घेतली. विशमी गुणरत्ने (36), चमारी अटापट्टू (51), निलाक्षिका सिल्वा (48) आणि हर्षिता समरविक्रमा (26) यांनी संघाला 31 षटकांत 3 बाद 173 अशी मजल मारून दिली होती. मात्र त्यानंतर सलग तीन षटकांत लंकेच्या तीन विकेट टिपत हिंदुस्थानी महिलांनी सामन्यावरही आपली पकड मजबूत केली. त्यानंतर श्रीलंकन संघाचा पराभव अटळ असल्यामुळे 49 व्या षटकांत त्याच्यावर हिंदुस्थानी संघाने 97 धावांच्या विजयासह शिक्कामोर्तब केले.
त्याआधी, हिंदुस्थानने 7 बाद 342 धावांचा डोंगर उभारला. स्मृती मानधनाने (116) प्रतिका रावलच्या (30) साथीत 70 धावांची सलामी देत हिंदुस्थानला झकास सुरुवात करून दिली.