
सामना ऑनलाईन । वॅलेण्सिया
हिंदुस्थानच्या फुटबॉल इतिहासात रविवारी रात्री सुवर्णक्षण नोंदवला गेला. हिंदुस्थानच्या २० वर्षांखालील संघाने फुटबॉल विश्वातील बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणार्या अर्जेंटिनाला २-१ अशा फरकाने धूळ चारली. तेही १० खेळाडूंसह खेळताना हे विशेष. हिंदुस्थानच्या युवा संघाने दिएगो मॅराडोना, लियोनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला हरवण्याची करामत कोटिफ कपमध्ये (फुटबॉल स्पर्धा) केली.
फ्लॉएड पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली कोटिफ स्पर्धेत उतरणार्या हिंदुस्थानी संघाला मर्सियाविरुद्ध २-० अशा फरकाने हार सहन करावी लागली होती. त्यानंतर मॉरितानिया यांच्याविरुद्धच्या लढतीतही ३-० अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. याआधीच्या लढतीत हिंदुस्थान-व्हेनेझुएला यांच्यामध्ये गोलशून्य बरोबरी झाली होती. हिंदुस्थानकडून चौथ्या मिनिटाला दीपक तंगरी याने पहिला गोल केला. तसेच त्यानंतर ६८व्या मिनिटाला अन्वर अलीने दुसरा गोल करून हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
सहा वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला दणका
हिंदुस्थानच्या संघाने २० वर्षांखालील गटाचे सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या अर्जेंटिनाला पराभवाचा दणका दिला. अर्जेंटिना संघाला लियोनेल स्कॅलोनी या २००६ सालातील वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच माजी मिडफिल्डर पाब्लो एमर हाही त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहे. त्यामुळे हिंदुस्थानची ही कामगिरी वाखाणण्याजोगी ठरली आहे.
स्टीफन यांच्या टीकेनंतर
काही दिवसांपूर्वीच हिंदुस्थानच्या सीनियर संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेण्टाईन यांनी १७ वर्षांखालील संघाच्या वर्ल्ड कपमधील सुमार कामगिरीवर टीका केली होती. त्यानंतर आता हिंदुस्थानच्या २० वर्षांखालील संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे.
आता आदराने बघितले जाईल
या विजयानंतर जागतिक फुटबॉलमध्ये हिंदुस्थानकडे आदराने बघितले जाईल. तसेच हिंदुस्थानला आता सातत्याने बलाढ्य संघाविरुद्धच्या लढतींमध्ये आपली क्षमता ओळखण्याची संधी मिळेल असे मत प्लॉएड पिंटो यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
























































