
जगभरात हाहाकार उडवणाऱ्या कोरोनाने हिंदुस्थानातही मृत्यूचे थैमान घातले. देशात आतापर्यंत 4,83,178 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. मात्र सायन्स जर्नलच्या मते हा आकडा सहापटीने जास्त असू शकतो. सायन्स जर्नलच्या संशोधनानुसार कोरोनामुळे देशभरात किमान 31 लाख जणांचा मृत्यू झाला आहे.
सायन्स जर्नलच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकात कोरोनाचा समग्र आढावा घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या काळात आलेल्या दुसऱ्या लाटेत 71 टक्के म्हणजेच तब्बल 27 लाख मृत्यू कोरोनामुळे झाले असे संशोधनात समोर आले आहे. या काळात कोरोनामुळे मृत्यूदर दुप्पट झाला होता. दर दहा लाख लोकांमागे 345 मृत्यू झाले आहेत.
देशातील कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूचे अपूर्ण प्रमाणिकरण तसेच मृत्यूमागे इतर आजारांची कारणे दिल्याने खरा आकडा समोर आला नाही, असे संशोधकांनी म्हटले आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ग्रामीण भागात झाले असून, त्याची नोंदच झालेली नाही असेही या संशोधनात म्हटले आहे.
सायन्स जर्नलच्या संशोधकांनी 10 राज्यांतील 1.4 लाख लोकांशी फोनवरून संपर्क केला. दोन लाख सरकारी आरोग्य केंद्र, नागरिक नोंदणी व्यवस्थेतून मिळालेल्या माहितीचे संकलन करून कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी शोधण्यात आली. या संशोधनासाठी संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाच्या डेटाचाही वापर करण्यात आला.
”कोरोना महामारी हिंदुस्थानात येईपर्यंत आम्ही युरोपच्या दराच्या आधारे मृत्युदराचा अंदाज बांधला होता. त्यानुसार हिंदुस्थानात सुमारे 22 लाख मृत्यू झाले असते. मात्र केवळ हजारो मृत्यूंची नोंदच होत असून, ही लाजिरवाणी बाब आहे. माझ्या मते हिंदुस्थानात कोरोनामुळे किमान 30 लाख मृत्यू झाले आहेत.”
डॉ. जयप्रकाश मुलीयल, वैज्ञानिक सल्लागार प्रमुख, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी




























































