
आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-4 फेरीतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियाची गाठ श्रीलंकेशी पडणार आहे. हिंदुस्थानने सलग पाच सामने जिंकत अपराजित राहून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे उभय संघांमधील लढत केवळ औपचारिकता असेल, मात्र किताबी लढतीपूर्वी हिंदुस्थानी संघाचे लक्ष मागील सामन्यांमध्ये झालेल्या चुका सुधारण्यावर असेल. पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धच्या सामन्यांमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी अनेक झेल सोडले होते.
यादवसेनेने सोडले डझनभर झेल
हिंदुस्थानने बांगलादेशवर विजय मिळविल्यानंतर श्रीलंका संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाद झाला. कारण श्रीलंकेला सुपर-4 फेरीत बांगलादेश आणि पाकिस्तानकडूनही पराभव स्वीकारावा लागला होता. हिंदुस्थानी संघ विजय रथावर स्वार असला तरी क्षेत्ररक्षणातील चुका संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात.
पाकिस्तानविरुद्ध सुपर-4 सामन्यात हिंदुस्थानी खेळाडूंनी अनेक झेल सोडले होते. त्यानंतर बांगलादेशविरुद्धही फिल्डिंगमध्ये निराशाजनक कामगिरी दिसली. अंतिम सामन्यापूर्वी हिंदुस्थानी खेळाडूंना क्षेत्ररक्षण सुधारण्याची नितांत गरज आहे. कारण एका चुकीमुळे निकालावर मोठा परिणाम होऊ शकतो. आतापर्यंतच्या पाच सामन्यांत सूर्यकुमार यादवच्या सेनेने तब्बल 12 झेल सोडले आहेत. याबाबतीत हाँगकाँगदेखील (11 झेल) हिंदुस्थानच्या मागे आहे.