
हिंदुस्थानच्या युवा क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी बहरीनमधून आली आहे. श्रीय साटमने नुकत्याच पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मुलींच्या पारंपरिक मिश्र मार्शल आर्ट्स (एमएमए) 50 किलो वजन गटात रौप्य पदक पटकावत हिंदुस्थानचा झेंडा उंचावला. या वर्षी प्रथमच मिश्र मार्शल आर्ट्सचा समावेश या स्पर्धेत पदक प्रकार म्हणून करण्यात आला होता आणि त्या पहिल्याच वर्षी श्रीयाने आपल्या दमदार कामगिरीने हिंदुस्थानचे नाव चमकवले.
श्रीयाने गेल्या काही महिन्यांपासून अतिशय कठोर प्रशिक्षण घेतले होते. तिच्या खेळात एकाग्रता, शिस्त आणि चिकाटी यांचा सुंदर संगम दिसून आला. प्रत्येक लढतीत तिने फक्त प्रतिस्पर्ध्याशी नव्हे, तर स्वतःच्या मर्यादांशी झुंज दिली. तिचं हे यश केवळ वैयक्तिक नाही, तर हिंदुस्थानच्या मिश्र मार्शल आर्ट्ससाठी नवा अध्याय ठरलं आहे.
हिंदुस्थानी मिश्र मार्शल आर्ट्स महासंघाचे अध्यक्ष आणि श्रीयाचे प्रशिक्षक निखिल कुंदर म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे. श्रीयाच्या कामगिरीमुळे स्पष्ट होतं की, हिंदुस्थानचा एमएमए किती पुढे जाऊ शकतो. आपल्या खेळाडूंमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे आणि हा प्रवास आता सुरू झाला आहे. आपल्याला अजून खूप मोठा मार्ग गाठायचा आहे. कुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीयाने केवळ तांत्रिक कौशल्य विकसित केले नाही, तर मानसिक ताकदही निर्माण केली जी मिश्र मार्शल आर्ट्ससारख्या जिद्दी आणि शारीरिक खेळासाठी अत्यावश्यक असते.
बहरीनमधील या रौप्य पदकाने श्रीयाने सिद्ध केलं की, हिंदुस्थानच्या कन्या कोणत्याही रिंगमध्ये मागे नाहीत. तिचं यश अनेक तरुणींना प्रेरणा देणारं ठरेल. आता तिचं पुढचं ध्येय म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक काबीज करणे. तिच्या जिद्दीवरून आणि आत्मविश्वासावरून एवढं मात्र नक्की हा प्रवास रौप्याचा असला तरी त्याचा शेवट नक्कीच सुवर्णमय होणार आहे.


























































