
मलेशिया दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवादविरोधी भूमिका मांडली. ‘‘शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाला हिंदुस्थानचा नेहमी पाठिंबा असेल, मात्र दहशतवादाशी कधीही तडजोड केली जाणार नाही,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम व मोदींच्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. दोन्ही नेत्यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘‘दहशतवादाच्या बाबतीत हिंदुस्थानची भूमिका स्पष्ट आहे. दुटप्पीपणा नाही आणि तजजोडही नाही,’’ असे मोदी या वेळी म्हणाले.
सहकार्यासाठी कटिबद्ध
‘‘हिंदुस्थान आणि मलेशियातील सहकार्य विश्वासावर आधारलेले आहे. दहशतवाद, समुद्री सुरक्षा, गुप्त माहितीची देवाणघेवाण यासह संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत,’’ असे मोदींनी या वेळी सांगितले.
























































