दोन दशकांनंतर पात्रतेचा गोल, हिंदुस्थानी महिला आशिया कप फुटबॉलसाठी पात्र

तब्बल दोन दशकांनंतर हिंदुस्थानच्या युवतींनी पात्रतेचा गोल ठोकला. थुवुन्ना स्टेडियमवर झालेल्या गट ‘डी’ मधील अखेरच्या सामन्यात यजमान म्यानमारवर 1-0 अशी मात करत हिंदुस्थानच्या 20 वर्षांखालील महिला राष्ट्रीय संघाने एएफसी 20 वर्षांखालील महिला आशिया कपसाठी पात्रता मिळवली. विंगर पूजाने 27 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे यंग टायग्रेसने विजय मिळवत गटात अव्वल स्थान पटकावले आणि 7 गुणांसह पात्रता निश्चित केली. पहिल्या सत्रात हिंदुस्थानचा स्पष्ट वर्चस्व होता, तर दुसऱया सत्रात म्यानमारने आक्रमक खेळ केला.

सामन्याच्या तिसऱयाच मिनिटाला नेहा आणि सिबानी देवी नोंगमीकापम यांनी उत्कृष्ट समन्वय साधत गोलजवळ संधी निर्माण केली. नवव्या मिनिटाला यजमानांच्या सू सू खिनला संधी मिळाली, मात्र ती निष्फळ ठरली. तिसाव्या मिनिटाच्या आधीच पूजाने उजव्या बाजूने हल्ला चढवत क्रॉस दिला. नेहाने तो चेंडू परत गोलसमोर पाठवला आणि गोलपोस्टवर पोहोचलेल्या पूजाने आपल्या शरीरावर लागलेला चेंडू जाळय़ात धाडला. या गोलमुळे पहिल्या हाफअखेर हिंदुस्थानने आघाडी कायम ठेवली.

दुसऱया हाफमध्ये म्यानमारने स्थानिक प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर सामन्यात रंग चढवण्याचा प्रयत्न केला. 48 व्या मिनिटाला गोलरक्षक मोनालिशा देवीने सू सू खिनचा प्रयत्न अप्रतिम पद्धतीने रोखला. अखेरच्या दहा मिनिटांत म्यानमारच्या मो प्किंट फ्यूने एई थेट फ्यूच्या क्रॉसवर हेडर मारला, पण मोनालिशाने झेप घेत चेंडू रोखला. 90 व्या मिनिटालाही फ्यूचा प्रयत्न गोलपोस्टला लागून बाहेर गेला.