
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पाच राज्यांत सपाटून मार खाल्ल्यानंतर मोदी सरकार ताळय़ावर आले आहे. दोन दिवसांपूर्वीच 33 वस्तूंवरील जीएसटी कमी केल्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीत मोठा फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. 28 टक्क्यांचा स्तर रद्द करून नवीन स्तररचना आणण्यात येणार असल्याची माहिती जेटली यांनी आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.
पाच राज्यांत झालेल्या पराभवाला जीएसटीतील जाचक अटी कारणीभूत असल्याचे समोर आल्यानंतर हादरलेल्या मोदी सरकारने जीएसटीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. जीएसटी परिषदेच्या 31 व्या बैठकीत 33 वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या ब्लॉगमध्ये 28 टक्क्यांचा स्तर रद्द करून करांची नवीन स्तररचना आणण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. शून्य टक्क्याचा पहिला स्तर असेल. पाच टक्क्यांचा दुसरा आणि तिसरा स्तर 12 टक्के व 18 टक्क्यांच्या स्तरांचे एकत्रीकरण करून नवीन बनवण्यात येणार आहे. मात्र ही नवी स्तररचना जीएसटीतून होणारी मासिक कमाई 1 लाख कोटींच्या पुढे गेल्यास अमलात आणणे शक्य होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
सध्या तंबाखू उत्पादने, एसी, लक्झरी वाहने, मोठे टीव्ही, डिशवॉशरसहीत सिमेंट, ऑटो पार्टस् अशा मोजक्याच वस्तूंवर 28 टक्के जीएसटी लावण्यात येतो. या वस्तूंचा वापर मध्यमवर्ग मोठय़ा प्रमाणावर करतो. या सर्व वस्तू 28 टक्क्यांच्या चौकटीतून बाहेर काढण्यात येणार आहेत. सध्या बरेचसे बांधकाम साहित्य 12 ते 18 टक्क्यांच्या चौकटीत आले आहे.




























































