
हिंदुस्थानातील बजेट एअरलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिगोने (IndiGo) देशभरातील विविध विमानतळांवर आणखी काही विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी इंडिगोच्या कामकाजात गोंधळ सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
देशातील सर्वात मोठी एअरलाइन असलेल्या इंडिगोच्या विमान सेवांमध्ये दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि इतर शहरांमध्ये अडथळा आला आहे. ज्यामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले. गुरुवारी पहाटे दिल्लीतून उड्डाण करणारी ३० हून अधिक इंडिगो विमाने रद्द करण्यात आली. हैदराबादमध्येही सुमारे ३३ उड्डाणे रद्द झाली. मुंबई विमानतळावरील अनेक उड्डाणेही रद्द झाली.
NDTV ने यासंदर्भातील वृत्तप्रसिद्ध केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, गुरुवारी १७० हून अधिक इंडिगो विमानांची उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. बुधवारी दिल्ली, मुंबई, बंगळूरु आणि हैदराबाद येथे एकत्रितपणे सुमारे २०० उड्डाणे रद्द झाली होती.
इंडिगोने व्यक्त केली दिलगिरी
दररोज सुमारे २,२०० उड्डाणे चालवणाऱ्या इंडिगोने आपल्या कामकाजात ‘लक्षणीय व्यत्यय’ आल्याचे मान्य केले आणि ग्राहकांची ‘माफी मागितली’.
बुधवारी जारी केलेल्या निवेदनात एअरलाइनने म्हटले आहे की, ‘अनेक अनपेक्षित आव्हाने, ज्यात किरकोळ तांत्रिक समस्या, हिवाळ्यातील वेळापत्रक बदल, प्रतिकूल हवामान, हवाई सेवेत वाढलेली गर्दी आणि अद्ययावत क्रू रोस्टरिंग नियमांची (Flight Duty Time Limitations – FDTL) अंमलबजावणी यामुळे आमच्या कामकाजावर परिणाम झाला. अशा प्रकारच्या परिस्थिचा अंदाज लावणे शक्य नव्हते’.
‘हे अडथळे कमी करून आणि हवाई वाहतूक पूर्ववत करण्यासाठी, आम्ही आमच्या वेळापत्रकात बदल सुरू केले आहेत. हे उपाय पुढील ४८ तास कायम राहतील. यामुळे आमचे कामकाज वेळेत करण्यास आणि हळूहळू सेवा पूर्ववत करण्यास मदत होईल’, असे इंडिगोने सांगितले.
९० देशांतर्गत आणि ४० आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर सेवा देणाऱ्या इंडिगोमध्ये गोंधळ होण्यामागे मुख्य कारण म्हणजे, नोव्हेंबरमध्ये सुधारित FDTL (पायलटच्या विश्रांतीचे नियम) लागू झाल्यानंतर कर्मचारी, विशेषतः वैमानिक, यांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. या नवीन नियमांमुळे अधिक विश्रांतीचे तास आणि मानवी दृष्टिकोन असलेले रोस्टर (duty chart) अनिवार्य झाले आहेत.
विमान वाहतूक नियामकाने घेतली गंभीर दखल
विमान वाहतूक नियामक संस्था, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA), ने गुरुवारी एअरलाइन अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बुधवारी, DGCA ने सांगितले होते की, ते इंडिगोच्या विमान सेवांच्या व्यत्ययाची चौकशी करत आहेत आणि एअरलाइनला सध्याच्या परिस्थितीची कारणे तसेच उड्डाणे रद्द आणि विलंबाची संख्या कमी करण्याच्या योजना सादर करण्यास सांगितले आहे.

























































