लँडिंगवेळी शिल्लक होते अवघ्या 2 मिनिटांचे इंधन!

अयोध्येवरून दिल्लीला निघालेले इंडिगो विमान खराब हवामानामुळे उतरलेच नाही. धक्कादायक म्हणजे विमानात फक्त काही मिनिटे पुरेल एवढेच इंधन असल्याने काही काळ प्रवासी हवेतच होते. याच विमानातून प्रवास करत असलेले पोलीस उपायुक्त सतीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, ‘इंडिगोचे हे विमान 13 एप्रिलला दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी आयोध्येतून निघणार होते आणि संध्याकाळी 4.30 मिनिटांनी दिल्लीला पोहचणार होते. विमान उतरण्याच्या 15 मिनिटे अगोदर पायलटने सांगितले की, दिल्लीमध्ये खराब वातावरण असल्यामुळे विमान तेथे उतरवले जाणार नाही. काही वेळ विमान आकाशातच घिरटय़ा मारू लागले. विमान दोन वेळा उतरवण्याचा प्रयत्नसुद्धा यशस्वी झाला नाही.’ अखेर विमान उतरल्यानंतर क्रूमधील काही व्यक्तींनी सांगितले की, आम्ही शेवटच्या क्षणाला विमान लँड केले आहे. विमानात एक ते दोन मिनिटांचे इंधन शिल्लक होते. हा मोठा बेजबाबदारपणा असल्याचा आरोप सतीश कुमार यांनी केला आहे. तर विमानाला इतर सुरक्षित विमानतळावर घेऊन जाण्यासाठी विमानात इंधन होते, असा खुलासा इंडिगोने केला.