हिंदुस्थानी नागरिकांना इंडोनेशिया व्हिसा-मुक्त प्रवेश देण्याची शक्यता

हिंदुस्थानातील पर्यंटकांना आकर्षित करण्यासाठी थायलंड, श्रीलंका आणि मलेशिया या देशांनी व्हिसामुक्त प्रवेशाची परवानगी दिली आहे. या देशांच्या यादीत इंडोनेशियाचा सुध्दा समावेश होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली इंडोनेशियाने सुरु केल्या आहेत.

लोकसंख्येच्या बाबतीत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या हिंदुस्थानातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इंडोनेशियाचे प्रयत्न सुरु आहेत. एक महिन्याच्या आत व्हिसामुक्त प्रवेशाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाच्या पर्यटन मंत्रालयाने या प्रस्तावावर विचार सुरू असल्याची माहिती दिली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाचे पर्यटन मंत्री सैंडियागा यूनो यांनी हिंदुस्थानसह अन्य काही देशांच्या पर्यटकांना व्हिसामुक्त प्रवासाची परवानगी देण्याचा प्रस्ताव चाचपून पाहण्याचे आदेश दिले आहेत.

इंडोनेशिया पर्यटनाच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी इंडोनेशियाने अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान, दक्षिण कोरिया, जर्मनी, ब्रिटेन आणि फ्रांस या देशांसहित अन्य 20 देशांमधील नागरीकांना व्हिसामुक्त प्रवेशाची परवानगी देण्यासंदर्भात विचार सुरू केला आहे.

पर्यटन हे जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत आहे. कोविड काळात काळात लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे पर्यटनक्षेत्राला मोठा फटका बसला होता. या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी काही देशांनी हिंदुस्थानसह अन्य देशाच्या नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. मलेशिया, थायलंड, श्रीलंका या देशांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी व्हिसामुक्त प्रवेशाची परवानगी दिली आहे.

सप्टेंबरमध्ये इंडोनेशियाने विदेशी नागरिक आणि कॉर्पोरेट गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी गोल्डन व्हिसाची घोषणा केली होती. तर, थायलंडने व्हिसामुक्त प्रवेशाची घोषणा नोव्हेंबर मध्ये केली होती. हिंदुस्थानातील पर्यटकांना 10 नोव्हेंबर 2023 पासून 10 मे 2024 पर्यंत 30 दिवसांसाठी थायलंडमध्ये व्हिसामुक्त प्रवास करता येणार आहे.