उद्योजकांच्या समस्यांबाबत 15 दिवसांत मंत्रालयात बैठक, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योग क्षेत्रातील समस्या गंभीर आहेत. या समस्यांबाबत ग्रामविकास, नगरविकास, सहकार, उद्योग विभाग, उद्योग संस्थांचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक 15 दिवसांत मंत्रालयात घेऊन त्यांच्या समस्यांवर खात्रीने तोडगा काढला जाईल, असे आश्वासन शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले.

यड्राव (ता. शिरोळ) येथे शरद इन्स्टिटय़ूटमध्ये पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित परिसंवाद व सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मंत्री सुभाष देसाई यांनी शिरोळ-हातकणंगले तालुक्यातील उद्योजकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजावून घेतले. या वेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बागणे हे प्रमुख उपस्थित होते.

मंत्री सुभाष देसाई म्हणाले, एकात्मिक औद्योगिक वसाहत धोरण शासनाने जाहीर केले आहे. या धोरणाचा सहकार तत्त्वावर वापर करता येईल का, हे पाहू. उद्योजकांनी या धोरणांचा लाभ घ्यावा. शासनाने औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांसाठी निधी निर्माण केला आहे. अर्थ मंत्री अजित पवार यांच्याकडून येत्या अंदाजपत्रकात त्याची घोषणा होईल. एकात्मिक औद्योगिक वसाहत आणि सहकारी औद्योगिक वसाहत यांची सांगड घातली जाईल. शेतीवर आधारित उद्योग उभारणीवर भर देण्याचे धोरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आहे. सहकारी तत्त्वावर एकत्र येऊन लघुउद्योग उभारण्यासाठी शासनाचा पाठिंबा आहे.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्यात एमआयडीसी नाही. कै. श्यामराव पाटील-यड्रावकर, ल.क. अकिवाटे यांनी शेतकऱयाचा मुलगा उद्योजक व्हावा, या हेतूने सहकारी औद्योगिक वसाहती सुरू केल्या. यामधून 35 हजार लोकांना रोजगार व शासनाला 10 हजार कोटींचा महसूल मिळतो. उद्योगाला चालना व हाताला काम देण्यासाठी एमआयडीसीची शिरोळ तालुक्यात गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना कर भरावा लागतो. मात्र त्यांच्याकडून सुविधा मिळत नाहीत. वीज बिलातील तफावत दूर व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या वेळी इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे, राज्य सहकारी औद्योगिक वसाहत फेडरेशनचे अध्यक्ष सचिन पाटील, ल.क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष गजाधर मानधना, शाहू वसाहतीचे अशोक माने, चंद्रकांत माने, अनिल कुडचे, इचलकरंजी इंजिनीअरिंग असोसिएशनचे जगदाळे, स्लिमा असोसिएशनचे शीतल केटकाळे, सायझिंग असोसिएशनचे जयंत मराठे, उद्योगपती राजेंद्र मालू, जिवंधर मुरचुट्टे, पार्वती वसाहतीचे सीईओ अभिजित पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश मलमे, महावीर खवाटे, शीलकुमार पाटील, दामोदर मालपाणी, सचिन मगदूम यांच्यासह जयसिंगपूरचे नगरसेवक, असोसिएशनचे संचालक आदींसह उद्योजक उपस्थित होते. गजानन सुलतानपुरे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन चद्रकांत पाटील यांनी केले. संतोष पाटील यांनी आभार मानले.