
हिंदुस्थान व दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ट्वेण्टी-20 मालिकेसाठी टीम इंडियातील खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली. ट्वेण्टी-20 संघामध्ये 15 वर्षीय शफाली वर्मा हिची निवड करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरची खेळी पाहून तिने क्रिकेटपटू बनण्याचा निर्णय घेतला होता आणि आज ती हिंदुस्थानी संघाकडून खेळण्यासाठी सज्ज आहे.
सचिन तेंडुलकरने 2013 मध्ये हरयाणातील लाहिली मैदानावर आपला अखेरचा रणजी सामना खेळला होता. सचिनला पाहण्यासाठी 10 वर्षीय शफालीही मैदानावर पोहोचली होती. ही आठवण सांगताना शफाली म्हणते, ‘जेवढे लोक सचिन सरांना पाहण्यासाठी मैदानात उभे होते, तेवढेच बाहेरही उभे होते. त्यावेळी मला हिंदुस्थानमध्ये क्रिकेटर होणे किती मोठी गोष्ट आहे याची जाणीव झाली. त्यावेळी मी देखील क्रिकेटर होण्याचा निर्णय घेऊन टाकला.’
अविस्मरणीय खेळी
शफाली ही वयाने लहान असली तरी मैदानावर एखाद्या अनुभवी खेळाडूप्रमाणे गोलंदाजांचा समाचार घेते. आक्रमक खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. 2018 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय महिला टी-20 लढतीत नागालँडविरुद्ध तिने अवघ्या 56 चेंडूत 128 धावांची खेळी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.
ट्वेण्टी-20 संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), पूनम यादव, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, हर्लिन देओल, अनुजा पाटील, शफाली वर्मा, मानसी जोशी.



























































