
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
महागाईने नवीन रेकॉर्ड करताना चार वर्षांतील उच्चांकी दर गाठला आहे. जून महिन्यात होलसेल प्राईज इंडेक्स (घाऊक किंमत निर्देशांक) ५.७७ टक्क्यांवर गेला आहे. भाज्यांचे दर ८.१२ टक्क्यांनी वाढले तर, इंधन दरवाढ सुरूच आहे. दरम्यान, महागाईचे चटके जनतेला यापुढेही सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात किरकोळ बाजारात महागाईचा निर्देशांक (रिटेल प्राईज इंडेक्स) ५ टक्क्यांवर गेला. पाच महिन्यातील हा उच्चांक हेता. मात्र, आज जाहीर केलेल्या घाऊक किंमत निर्देशांकाने चार वर्षांतील विक्रम केला आहे. यापूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये हा निर्देशांक ५.९ टक्के होता. जेव्हा घाऊक किमतीमध्ये वाढ होते तेव्हा किरकोळ बाजारातही वाढ होत असते. मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक ४.४३ टक्के होता. एका महिन्यात ०.९० टक्के वाढ होऊन हा निर्देशांक ५.७७ टक्क्यांवर गेला आहे.
महागाईचे चटके
- जूनमध्ये भाज्यांचे दर ८.१२ टक्क्यांनी वाढले. मे महिन्यात २.५१ टक्के ही वाढ होती.
- जून महिन्यात बटाटय़ाचे दर तब्बल ९९.०२ टक्क्यांनी वाढले आहेत. मे महिन्यात ८१.९३ टक्क्यांनी बटाटे महाग झाले होते.
- कांदाही १८.२५ टक्क्यांनी महागला आहे. मेमध्ये ही दरवाढ १३.२० टक्के होती.
- सततच्या इंधन दरवाढीचा फटका जनतेला बसत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर जूनमध्ये १६.१८ टक्क्यांनी वाढले. मेमध्ये ही वाढ ११.२२ टक्के होती.
आणखी रेपोरेट वाढीची शक्यता
रिझर्व्ह बँकेने मेमध्ये पतधोरण जाहीर करताना रेपोरेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे गृहकर्जासह इतर कर्जांचे व्याजदर वाढले. एक ऑगस्टला रिझर्व्ह बँक तिसरे द्विमासिक पतधोरण जाहीर करेल. त्यावेळी रेपोरेटमध्ये पुन्हा ०.२५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेने २०१८-१९ मध्ये महागाईचा दर ४ टक्क्यांपर्यंत ठेवण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते; परंतु जूनमध्येच महागाईने ५.७७ टक्के दर गाठला आहे.




























































