मोदी सरकारकडून जनतेची ‘रेकॉर्डब्रेक’ लूट!

27

सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली

पेट्रोल दरवाढीची वाटचाल 90 रुपये प्रतिलिटरकडे वेगाने सुरु असून, देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून जनतेची ‘रेकॉर्डब्रेक’ लुट सुरु असल्याचा संताप सर्वत्र व्यक्त होत आहे. दरम्यान, पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने येत्या सोमवारी (दि. 10) हिंदुस्थान बंदची हाक दिली आहे.

रोजच्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली आहे. गुरुवारी पेट्रोल 20 पैसे, तर डिझेल 21 पैसे प्रतिलिटरने महागले. ऑगस्टपासून पेट्रोल आणि डिझेलची सुमारे अडीच रुपयांनी दरवाढ झाली आहे. ही दरवाढ कायम राहिल्यास दहा ते पंधरा दिवसात पेट्रोल 90 रुपये प्रतिलिटर होऊ शकते. डिझेलची वाटचाल 80 रुपये प्रतिलिटरकडे सुरू आहे.

मुंबईत सर्वाधिक दर
देशातील प्रमुख चार महानगरांमध्ये मुंबईत सर्वात जास्त पेट्रोल, डिझेल महाग आहे. पेट्रोल 86.91 रुपये तर डिझेल 76.96 रुपये प्रतिलिटरवर गेले आहे. दिल्लीत पेट्रोल 79.51, तर डिझेल 71.55 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
पुण्यात पेट्रोल 86.61 रुपये, तर डिझेल 74.47 रुपये प्रतिलिटर झाले आहे.

सर्वच महाग; सरकारकडून दिलासा नाहीच
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा थेट परिणाम महागाईवर होतो. डिझेल महाग झाल्यामुळे मालवाहतूक महागली. त्यामुळे भाजीपाल्यापासून अनेक वस्तूंचे दर वाढले आहेत.
प्रवासी वाहतूक, स्कूल बसही महागली आहे.
सणासुदीच्या दिवसांमध्ये जनतेची ‘रेकॉर्डब्रेक’ लूट सुरु असताना सरकारकडून मात्र कोणताही दिलासा दिला जात नाही.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे पेट्रोल, डिझेल दरवाढ होत असल्याचे कारण सरकार देत आहे.
पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करामध्ये कपात करणार नसल्याचे संकेत काल केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिले होते.
इंधनावरील अबकारी करापोटी मिळणारे उत्पन्न सरकारला कमी करायचे नाही. त्यामुळे सरकार कर कमी करणार नसल्याचे आज सरकारी सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसने दिली हाक; सोमवारी बंद!
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने येत्या सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. त्याविरूद्ध पुकारलेल्या बंदमध्ये विरोधी पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. जनतेचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी हा बंद आहे. नागरिकांची कोंडी होऊ नये यासाठी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद पाळला जाईल असे काँग्रेसनेते अशोक गेहलोत आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरवर भरमसाठ कर लावून मोदी सरकारने साडेचार वर्षात 11 लाख कोटी रुपये कमावले. जनतेची लूट करून हा पैसा कोणाच्या खिशात गेला? असा सवालही त्यांनी केला.

summary- inflation is breaking records in modi govt

आपली प्रतिक्रिया द्या