महागाईचा कहर! साडेपाच वर्षांतील उच्चांकी दर; जनतेचा खिसा रिकामा होणार

546

भाजीपाला, कांदा, अन्नधान्य आणि किरकोळ बाजारात वस्तूंची मोठी दरवाढ झाल्याने देशात महागाईने अक्षरशः कहर झाला आहे. गेल्या साडेपाच वर्षांतील उच्चांकी 7.35 टक्क्यांवर महागाईचा दर गेला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू असतानाच अन्नधान्य, भाजीपाल्याचे भाव कडाडल्याने सर्वसामान्य जनतेचा खिसा रिकामा होणार आहे. दरम्यान, महागाईमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने जनतेचे कंबरडेच मोडणार आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने महागाईसंदर्भात आकडेवारी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँकेकडून चालू आर्थिक वर्षातील 2019-20 मधील शेवटचे पतधोरण 6 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. डिसेंबरच्या पतधोरणाप्रमाणे आता फेब्रुवारीतही रेपोरेटमध्ये कपात होण्याची शक्यता कमीच आहे.

अशी वाढली महागाई
नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 5.54 टक्के होता. डिसेंबर 2019 मध्ये 7.35 टक्क्यांवर गेला. गेल्या साडेपाच वर्षांतील सर्वाधिक महागाई आहे.
सर्वाधिक महागाई कांदा आणि भाजीपाल्यामध्ये झाली आहे. डिसेंबर 2018च्या तुलनेत डिसेंबर 2019 मध्ये भाजीपाल्याच्या दरात तब्बल 60.5 टक्क्यांनी वाढ झाली.
अन्नधान्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर 2018 मध्ये उणे 2.65 टक्के हा दर होता. डिसेंबर 2019 मध्ये 14.12 टक्क्यांवर गेला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये 10 टक्के होता. यामध्ये एका महिन्यातच 4.12 टक्क्यांनी अन्नधान्य महागले आहे.
डाळींचा महागाई दर 15.44 टक्के तर मासे-मटणाचा महागाई दर 10 टक्क्यांवर गेला.
रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दर 2 ते 6 टक्के ठेवला होता, मात्र महागाई 7.35 टक्क्यांवर गेली.
अमेरिका-इराणमधील तणाव, आर्थिक मंदी यामुळे इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या