
सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करून त्यावर जास्तीत जास्त लाईक्स आणि व्ह्युज मिळवण्याचे काही जणांना प्रचंड वेड असते, पण वेडापायी काहीवेळा जीवघेणी दुर्घटनाही घडू शकते. अशीच घटना हाँगकाँगमधील एका इंस्टाग्राम स्टार तरुणीच्या बाबतीत घडली आहे.
हाँगकाँगमध्ये राहणारी इंस्टाग्राम स्टार अशी ओळख असलेल्या सोफिया नावाच्या तरुणाला एका भयंकर अपघाताला तोंड द्यावे लागले. शनिवारी सकाळी 11 वाजता ही तरुणी आपल्या तीन मैत्रिणींसह ‘हा पाक लाई’ पार्कमध्ये सहलीसाठी गेली होती. येथे सूर्यास्ताकरिता प्रसिद्ध असलेल्या पाइनॅपल डोंगराजवळून वाहणाऱ्या धबधब्याजवळ तिने सेल्फी घ्यायचं ठरवलं. सेल्फी घेत असताना अचानक डोंगरावरून तिचा पाय घसरला आणि ती 16 फूट उंचावरून खाली पडली.
या अपघातानंतर सोफियाच्या मैत्रिणींनी आपत्काळ सेवा कर्मचाऱ्यांना संपर्क करून तिला रुग्णालयात भरती केले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. सोफिया धाडसी होती. तिचे अत्यंत धोक्याच्या ठिकाणी काढलेले सेल्फी तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर तिची शेवटची पोस्ट 8 जुलैला तिने शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले होते की, ‘चांगले दिवस जवळ येत आहेत. त्यांना शनिवार आणि रविवार म्हणतात.’




























































