
पवनमावळात लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, कोरीगड असे एकापेक्षा एक सरस अवशेष संपन्न किल्ले आहेत. बहुतांशी दुर्गप्रेमी या किल्ल्यांवर कायमच गर्दी करतात. पण याच किल्ल्यांच्या परिघात, मध्यवर्ती आडरानात एक किल्ला आजही अलिप्तपणे उभा राहून भटक्यांना आपल्याकडे येण्यासाठी खुणावतो आहे. हा किल्ला म्हणजे किल्ले मोरगिरी होय.
पुणे-लोणावळा-अँबी व्हॅलीमार्गे घुसळखांब फाटा गाठून डावीकडे जाणाऱया गाडी रस्त्याने आपण मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जांभुळपाडा वस्तीमध्ये पोहोचतो. जांभुळपाडा वस्तीमागून मळलेल्या पायवाटेने आपण गर्द झाडीतून मार्ग काढत दहा-पंधरा मिनिटांत एका खिंडीजवळ येतो. येथून डावीकडे वळून खडी चढण पार करत आपण डोंगरमाथ्यावरील सपाटीवर येऊन पोहोचतो. सपाटीवर पोहोचल्यानंतर आपणास मोरगिरी किल्ल्याचे दर्शन होते. मोरगिरी किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी विस्तीर्ण पठार आहे. सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने जागोजागी किल्ल्याकडे जाणाऱया मार्गावर छोटे बोर्ड लावले आहेत. आपण त्याचा आधार घेऊन मोरगिरी किल्ल्याच्या मुख्य कातळाला भिडायचे. ही वाट घसरडी असल्याने आपण काळजीपूर्वक आगेकूच करायची. शेवटी एक अवघड रॉक पॅच काळजीपूर्वक पार करून आपण गडाच्या मुख्य कातळाजवळ येऊन पोहोचतो.
वर पोहोचल्यानंतर उजवीकडे दरी, तर डावीकडे गडाचा कातळ अशा अरुंद पायवाटेने आपण आस्तेकदम वाटचाल करायची. वाटेत गडाच्या पोटात असलेल्या पाण्याच्या दोन कातळकोरीव टाक्या दिसून येतात. पुढे कडय़ाच्या टोकावर एक गुहा असून त्या गुहेत ‘जाखमाता’ देवीच्या तांदळा स्वरूपातील दोन मूर्ती आहेत. याच गुहेत जाखमातेच्या मूर्तीच्या बाजूलाच पाण्याचे अजून एक टापं आहे. या गुहेच्या वर गडमाथा आहे. गडमाथ्यावर जाण्यासाठी आधी गुहेच्या बाजूला दरीजवळ एक भलामोठा कातळटप्पा पार करावा लागत होता. पण तो मार्ग धोकादायक असल्याने सह्याद्री प्रतिष्ठानने त्या अवघड जागी लोखंडी शिडी बसवून गडमाथ्यावर जाण्याची सोय केली आहे. जाखमातेचे मनोभावे दर्शन घेऊन आपण काळजीपूर्वक ही शिडी चढून वर जायचे.
गडमाथा अत्यंत आटोपशीर आहे. माथ्यावर थंडगार पाण्याने भरलेले एक टापं असून त्याच्याच बाजूला अजून एक कोरडे टापं आहे. गडमाथ्यावरून जो काही सह्याद्रीच्या डोंगररांगांचा अद्भुत नजारा दिसतो तो आपले भान हरपून टाकतो.
खरे तर मोरगिरी हा दुर्गप्रेमींच्या अंगातील रग जिरवणारा किल्ला आहे. या किल्ल्याच्या परिघातले इतर किल्ले प्रसिद्ध असल्याने गर्दीचे पेंद्र ठरत आहेत. मोरगिरी किल्ला मात्र या गर्दी कोलाहलापासून दूर अलिप्त उभा राहून त्याला जवळ करणाऱया दुर्गप्रेमींना एक प्रकारचे आत्मिक समाधान देतो.
मोक्याचे स्थान
तुंग, तिकोणा, कोरीगड, लोहगड, विसापूर या स्वराज्यातील तालेवार किल्ल्यांमध्ये मोरगिरीचे स्थान मध्यवर्ती व मोक्याचे असल्याने शिवकाळात महत्त्वाच्या संदेशाची देवाणघेवाण करण्यासंदर्भात मोरगिरी निश्चितच मोलाची भूमिका बजावत असणार. मोरगिरी किल्ल्यावर येण्यासाठी गडपायथ्याच्या मोरवे गावातूनसुद्धा वाट आहे. या मोरवे गावातून मोराची पिसे पुण्यात पाठवली जायची अशी पेशवे दप्तरात नोंद आहे.
डॉ. संग्राम इंदोरे,
दुर्ग अभ्यासक

























































