
इन्फोसिस कंपनीच्या सीईओ आणि सीएफओवर अकाऊंटिंगमध्ये घोटाळा केल्याचा आरोप व्हीसलब्लोअर अर्थात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. परंतु, इन्फोसिसमध्ये अशी कोणतीही गडबड झाली नसल्याचे सांगत कंपनीने सर्व आरोप फेटाळले आहेत. एनएसई अर्थात नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने याप्रकरणी इन्फोसिसला उत्तर द्यायला सांगितले होते. त्यानुसार कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
संबंधित आरोपांबाबत अद्याप कुठल्याही प्रकारचे पुरावे मिळाले नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या स्पष्टीकरणानंतर कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांनी वधारले आहेत. सीईओ सलील पारेख आणि सीएफओ निलंजन रॉय यांच्यावर कंपनीतील काही कर्मचाऱयांनी अकाऊंटिंगमध्ये घोटाळा केल्याचा आरोप 21 ऑक्टोबर रोजी केला होता. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली होती.
























































