देव तारी त्याला कोण मारी! गाझामध्ये तब्बल 37 दिवसांना ढिगाऱ्याखाली राहूनही चिमुरडा बचावला

देव तारी त्याला कोण मारी ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. गाझामध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर तब्बल 37 दिवसांनी ढिगाऱ्याखाली एक चिमुरडा जिवंत सापडला आहे. तब्बल 37 दिवस ढिगाऱ्याखाली राहूनही हा चिमुरडा जिवंत होता. या बचावसलेल्या मुलाचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण भावूक होत आहे.

गल्फ न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे. ढिगाऱ्याखाली जिवंत सापडलेल्या या मुलाचा जन्म इस्रायल-हमास युद्ध सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधीच झाला होता. युद्ध सुरू झाल्यावर इस्रायलने गाझा पट्टीवर प्रचंड बॉम्बवर्षाव सुरू केला. त्यात असंख्य घरे नष्ट झाली. सर्वत्र मृतदेहांचे ढीग पडले होते. गाझा येथील निवासी भागात ढिगारेच ढिगारे दिसत होते. या उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली हा चिमुरडा होता.

इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात चिमुरड्याचे घर उद्ध्वस्त झाले असले तरी तो ढिगाऱ्याखाली श्वास घेत होता. ढिगाऱ्याखाली तब्बल 37 दिवस तो जिवंत होता. या ढिगाऱ्याखाली एक महिन्यापेक्षा जास्त काळ राहूनही हा चिमुरडा सुखरुप बचावला, हा चमत्कारच असल्याचे मानले जात आहेत. बचाव कार्यादरम्यान मदत कर्मचाऱ्यांनी या मुलाला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढले. तब्बल महिन्याभराने ढिगाऱ्याखाली हा चिमुरडा जिवंत आढळल्याने बचाव कर्मचारीही भावुक झाले.

सिव्हिल डिफेन्सचे सदस्य नोह अल शाघनोबी यांनी या चिमुरड्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर घराच्या ढिगाऱ्यातून या चिमुरड्याला कसे बाहेर काढण्यात आले, हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आल्यावर सर्वांनी देवाचे आभार मानले. तो चिमुरडा निरागसतेने इकडे तिकडे पाहताना दिसत आहे. मात्र, अद्याप या चिमुरड्याच्या कुटुंबाबाबत माहिती मिळालेली नाही.