
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर येथे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात 1491मधील शिलालेख आढळून आला आहे. भिवाजी नामक व्यक्तीने मंदिर बांधल्याचा उल्लेख यात आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी या लेखाचे संशोधन केले आहे. या लेखामुळे सांगली जिल्ह्याच्या बहमनी काळातील धार्मिक बाबीवर प्रकाश पडणार असल्याचे मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर यांनी सांगितले.
कुमठेकर म्हणाले, ‘कवलापूर येथे श्री सिद्धेश्वराचे ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर ग्रामदैवत आहे. तेथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. या मंदिरात प्रदक्षिणा मार्गावर भिंतीमध्ये जमिनीलगत एक शिलालेख आहे. कवलापूर गावातील पाच ऐतिहासिक शिलालेखांचा अभ्यास मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर हे करीत आहेत. याच अभ्यासादरम्यान हा लेख त्यांना आढळून आला. शिलालेखाच्या एकूण पाच ओळी आहेत. लेख संपूर्णपणे मराठी भाषेत आहे. बहमनीकालीन मराठी भाषेची वैशिष्टय़े या लेखात आढळून येतात. शके 1413 म्हणजे सन 1491च्या चैत्र महिन्यात हा लेख कोरण्यात आला आहे. लेखाच्या प्रारंभी मध्यभागी शिवलिंग कोरले असून, त्याच्या दोन्ही बाजूला सूर्य-चंद्र आणि गाईचे चित्र कोरले आहे. लेखाच्या शेवटी नमस्कार मुद्रेतील एका व्यक्तीचे चित्र आडव्या बाजूस आहे.’ या लेखाच्या अभ्यासासाठी मंदिराचे विश्वस्त डॉ. विवेक पाटील, दर्शन गुरव, प्रमोद लाड यांचे सहकार्य लाभले.
संपूर्ण मराठी भाषेतील आजवरचा पहिलाच लेख
सदर लेखाची भाषा ही संपूर्ण मराठी आहे. मोडी लिपीतील अक्षरांची काही वळणे येथे आढळतात. याच कवलापूर गावात देवगिरीचा यादव राजा कृष्णदेव याचा सन 1257 चा संस्कृत-मराठी मिश्रित लेख यापूर्वी आढळून आला आहे. मात्र, सिद्धेश्वर मंदिरात सध्या मिळालेल्या या लेखाची भाषा पूर्णपणे मराठी आहे. सांगली जिल्ह्यात आजवर उपलब्ध झालेल्या शिलालेखांपैकी संपूर्ण मराठी भाषा असणारा कालदृष्टय़ा हा पहिला शिलालेख आहे. बहमनीकालीन मराठी भाषेची वैशिष्टय़े जाणून घेण्यासाठी हा लेख उपयुक्त ठरणार आहे.
काय आहे शिलालेखात?
सिद्धेश्वर मंदिरात सापडलेल्या या शिलालेखात म्हटले आहे, ‘स्वस्ति श्री शेकू 1413 वर्षे विरोधिकृतुनाम सवछरे चैत सुध द्वादसी गुरुवारू ते दीसी भीवाजी बीन तानजी बहिरवदासु तेणे भीक्षा मागोनु देऊळ बाधळे’, असे म्हटले आहे. यामध्ये भीवजी हा स्वतःला बहिरवदास म्हणजे भैरवाचा दास म्हणवून घेतो. ज्या सिद्धेश्वर मंदिरात हा लेख आढळून आला, ते मंदिरही काळभैरवाचेच आहे. भीवाजीने भिक्षा मागून म्हणजे देणगी गोळा करून हे मंदिर बांधले असावे.




























































