इन्स्टाग्रामचे व्यसन गंभीर, बंगळुरु मेट्रोमधील दृश्य पाहताच स्टार्टअप संस्थापक काय म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरु येथील मेट्रोमध्ये प्रवास करताना एका स्टार्टअप संस्थापकाने केलेले निरीक्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. अलिकडे सर्वांमध्येच इन्स्टाग्रामचे व्यसन हे मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. बंगळुरु येथील उद्योजक वसंत शेट्टी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मेट्रोमधील अनुभव सांगितला. यावेळी त्यांना मेट्रोमध्ये तीन प्रकारचे प्रवासी दिसले. शेट्टी यांनी सांगितले की, ते कुटुंबाच्या कार्यक्रमासाठी उडपी येथे गेले होते. सकाळी सुमारे 5 वाजता ते बेंगळुरूला परतले आणि नम्म मेट्रोने ते प्रवास करत होते.

यावेळी त्यांनी केलेल्या निरीक्षणांतर्गत जवळपास १० टक्के प्रवासी हे झोप काढण्याचा प्रयत्न करत होते. तर काही प्रवासी हे मित्रांशी गप्पा मारत होते त्यांची संख्या सुमारे १० टक्के इतकी होती. तर उरलेले ८० टक्के प्रवासी हे मोबाईलमध्ये इन्स्टाग्राम पाहण्यात गुंतलेले होते. प्रवासी इन्स्टाग्राम पाहात होते हे त्यांच्या अंगठ्याच्या हालचालींवरुन स्पष्ट होत होते असे त्यांनी मत नोंदवले.

शेट्टी यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टनंतर सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात प्रतिक्रीयांचा पाऊस पडू लागला. अनेकांनी त्यांच्या निरीक्षणाशी सहमती दर्शवली, तर काहींनी सांगितले की, प्रवासादरम्यान मोबाईल वापरणे ही आजच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियाचा अतिरेक झाल्यास एकाग्रता कमी होणे, झोपेच्या समस्या आणि मानसिक ताण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.